ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्मण हाकेंचे मुंबईत जलसमाधी आंदोलन
- सरकारसह ओबीसी नेते-मंत्र्यांचा निषेध मुंबई, 3 जुलै (हिं.स.) - ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गिरगाव चौपाटीनजीक त्यांच्यासह काही विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी थेट समुद्रात उतरून ज
लक्ष्मण हाके जलसमाधी आंदोलन


- सरकारसह ओबीसी नेते-मंत्र्यांचा निषेध

मुंबई, 3 जुलै (हिं.स.) - ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गिरगाव चौपाटीनजीक त्यांच्यासह काही विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी थेट समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. यावेळी लक्ष्मण हाकेंसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो, अशा घोषणा देत त्यांनी सरकारचा निषेध केला. सरकारमधील ओबीसी नेत्यांचा आणि मंत्र्यांचा देखील यावेळी निषेध करण्यात आला.

एकीकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आग्रही आहेत. त्यासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी २९ ऑगस्टला त्यांनी मुंबईत धडकण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत.

यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी महाज्योती योजनेवर सरकारकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला. सरकारकडून सारथी आणि बार्टी सारख्या योजनांना भरभरून अनुदान दिलं जातं. पण ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महाज्योती योजनेला सरकारकडून पैसे दिले जात नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सारथी आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना नोंदणीच्या दिवसापासून फेलोशिप दिली जातेय, पण महाज्योतीला निधी दिली जात. तीन वर्षांपासून विद्यार्थी निधीसाठी झटत आहेत, पण सरकारकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे आम्ही आज समुद्रात उतरून आंदोलन करत असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली.

लक्ष्मण हाकेंच्या या आंदोलनानंतर पोलीस प्रशासन तातडीने गिरगाव चौपाटीवर दाखल झालं. पोलिसांनी पाण्यात शिरून लक्ष्मण हाकेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांकडून ही कारवाई केली जात असताना, ओबीसी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये फेलोशिपचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अनेक विद्यार्थी पीएच.डी करत असून, त्यांनाही फेलोशिपची प्रतीक्षा आहे. तीन तीन वर्षे झाली हे लढा देत आहेत. प्रामाणिकपणे शिक्षणासाठी भांडत आहेत. आम्हाला फेलोशिप दिली नाही. भटक्या मुक्त करून आणलंय का? असे एका विद्यार्थ्याने म्हटले. पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सर्व विद्यार्थ्यांना गिरगाव चौपाटीपासून दूर नेले. पोलिसांनी आंदोलकांना त्यांच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande