बुलढाणा, 3 जुलै (हिं.स.)।
प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेअंतर्गत शंभर टक्के सौर प्रकल्प स्थापन करण्यात आलेल्या गावांमधून स्पर्धात्मक पध्दतिने एका मॉडेल सोलर व्हिलेजची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या या मॉडेल सोलर व्हिलेजला केंद्र शासनाचे १ कोटी रूपयाचे अर्थसहाय्य मिळणार आहे. जिल्ह्यातील १५ महसूली गावात ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेतून एक मॉडेल सोलर व्हिलेज निवडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हास्तरीय समितीतील सदस्य, अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके आणि मॉडेल सोलर व्हिलेजच्या स्पर्धेसाठी पात्र जिल्ह्यातील ५ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या १५ महसूली गावातील सरपंच/सचिव यांच्याशी सविस्तर चर्चा करून स्पर्धेला प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली असून, स्पर्धेचा कालावधी पुढील सहा महिने राहणार आहे. निवडीसाठी जिल्हास्तरीय समितीव्दारे सहा महिन्यांनी स्पर्धेतील गावांची एकूण वितरित अक्षय ऊर्जा (RE) क्षमतेवर मूल्यांकन केले जाणार आहे आणि सर्वाधिक आरई क्षमता असलेल्या गावाची मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून निवड केली जाणार आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या गावातील सरपंच तसेच सचिव यांनी गावात मॉडेल सोलर व्हिलेज बाबत जनजागृती करावी, लोकांना माहिती देऊन सौर ऊर्जा आपल्या घराच्या छतावर बसविण्यासाठी प्रेरीत करावे. तसेच सौरऊर्जेचे फायदे सांगून सौल ऊर्जा स्थापित करण्याकरीता बँकेमार्फत कर्ज मिळणाऱ्या योजना, तसेच केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनांच्या बाबतीत मार्गदर्शन तसेच सहकार्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
मॉडेल सोलर व्हिलेज स्पर्धेत निवड झालेल्या १५ गावात ही स्पर्धा होणार आहे. या गावामध्ये प्रामुख्याने मोताळा तालुक्यातील धाननगाव बडे,सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन, देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही, बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई, कोलवड, साखळी बु., डोंगरखंडाळा, सागवण, जांब, धाड, सावळा सुंदरखेड,मेहकर तालुक्यातील जानेफळ, डोणगाव, लोणार तालुक्यातील किनगाव आणि खामगाव तालुक्यातील सुटाळा या गावाचा समावेश आहे.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने