नवी मुंबईत प्लास्टिकमुक्त शाळा उपक्रम उत्साहात साजरा
नवी मुंबई, 3 जुलै (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियान अंतर्गत विविध शाळांमध्ये ‘प्लास्टिकमुक्त शाळा’ उपक्र
नवी मुंबईत प्लास्टिकमुक्त शाळा उपक्रम उत्साहात साजरा


नवी मुंबई, 3 जुलै (हिं.स.)।

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियान अंतर्गत विविध शाळांमध्ये ‘प्लास्टिकमुक्त शाळा’ उपक्रम अतिशय उत्साहात राबविण्यात आला.

अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व स्मिता काळे यांच्या माध्यमातून सर्व विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या सहयोगाने शाळांमध्ये प्लास्टिक विषयक जनजागृतीपर उपक्रम आयोजनासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमाही मोठया प्रमाणात राबविण्यात आल्या.

कोपरखैरणे गाव येथील नमुंमपा शाळा क्रमांक 36 व 122 मध्ये घनकचरा व्यवस्थापन विभाग परिमंडळ 2 उपआयुक्त स्मिता काळे यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकपासून होणा-या धोक्याची कल्पना देऊन प्राधान्याने प्लास्टिक पिशव्यांचा व एकल वापर प्लास्टिकचा उपयोग पूर्णपणे थांबवावा असे आवाहन केले. याप्रसंगी कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त भरत धांडे व स्वच्छता अधिकारी राजूसिंग चव्हाण उपस्थित होते. यावेळी कॉन्सेट्रो पेमेंट सिस्टिम आर्किटेक्ट महापे यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून देण्यात आलेल्या 1000 कापडी पिशव्यांचे वितरण त्यांचे संचालक जितेश नायर व नायडू यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्लास्टिक प्रतिबंधाची सामुहिक शपथ घेण्यात आली.

अशाचप्रकारे नमुंमपा शाळा सानपाडा व तुर्भेगाव या ठिकाणीही तुर्भे विभागाचे सहा.आयुक्त सागर मोरे व स्वच्छता अधिकारी जयेश पाटील यांच्या पुढाकारातून प्लास्टिकमुक्त शाळा अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या तसेच त्यांना प्लास्टिक न वापरण्याची कारणे समजून सांगण्यात आली. अभियानाचा एक भाग म्हणून से.4 सानपाडा येथील मार्केटमध्येही विक्रेते आणि ग्राहक यांना प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन करण्यात आले व कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

घणसोली येथील नमुंमपा शाळा क्रमांक 105 येथे विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त उत्तम खरात व स्वच्छता अधिकारी विजय पडघन यांच्या माध्यमातून प्लास्टिकमुक्तीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये घणसोली परिसरात विद्यार्थ्यांची जनजागृतीपर रॅली काढण्यात आली तसेच प्लास्टिक प्रतिबंधात्मक शपथ घेऊन कापडी पिशव्या वितरित करण्यात आल्या.

वाशी विभागातही सहा.आयुक्त सुखदेव येडवे व स्वच्छता अधिकारी जयश्री आढळ यांच्या माध्यमातून नमुंमपा शाळा क्रमांक 27 व 29 मध्ये तसेच ऐरोली येथे सहा.आयुक्त सुनिल काठोळे व मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या नियोजनाखाली नमुंमपा शाळा क्रमांक 53 मध्ये जनजागृती करण्यात येऊन कापडी पिशव्या वितरीत करण्यात आल्या. दिघा येथील नमुंमपा शाळा क्रमांक 108 याठिकाणी विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत अवगत करुन सहा.आयुक्त नैनेश बदले व त्यांच्या सहका-यांनी उपक्रम यशस्वी केला.

बेलापूर विभागात सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या माध्यमातून से.38 डि मार्ट, से.42 परिसर व से.11 परिसर याठिकाणी नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करुन प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी नागरिकांच्या लक्षात आणून देण्यात आली व प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन करण्यात आले. नेरुळ विभागातही सहा.आयुक्त श्री. जयंत जावडेकर व त्यांच्या सहका-यांनी से.15 फकिरा मंडई याठिकाणी जनजागृती करीत कापडी पिशव्यांचे वाटप केले.

‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता व आरोग्याच्या अनुषंगाने प्रत्येक दिनांकास वेगवेगळे उपक्रम राबविण्याचे वेळापत्रक महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित केले असून त्यानुसार आजचा आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिवस हा प्लास्टिकमुक्त शाळा अभियान राबवत संपूर्ण नवी मुंबईत आठही विभागांमध्ये उत्साहाने साजरा करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande