मुंबई, 3 जुलै (हिं.स.)।राज्य शासनाने कोणत्याही बाइक ॲपला अद्याप अधिकृत परवानगी दिलेली नसताना अवैधरीत्या ॲपद्वारे प्रवाशाची बुकिंग घेणाऱ्या रॅपिडो बाइकला परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनीच रंगेहात पकडले.
राज्य सरकारच्या माध्यमातून बाईक टॅक्सी धोरण जाहीर करण्यात आले आहे. मात्र अद्याप पर्यंत कुठल्याही कंपनीला बाईक टॅक्सी चालवण्या संदर्भात अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही. त्यानंतरही काही कंपन्यांच्या माध्यमातून बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याची अनेक तक्रारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत सरनाईक यांनी बुधवार (2 जुलै) स्वतः या अनधिकृत टॅक्सीचा भंडाफोड केला.
प्रताप सरनाईक यांनी स्वतः नाव बदलून त्यांनी 'रॅपिडो अॅप'च्या माध्यमातून रॅपिडो बाईक बुक केली. मंत्रालयाबाहेर प्रताप सरनाईक आणि त्यांचे सहकारी गाडीची वाट बघत होती. गाडी आल्यानंतर ज्या कंपनीच्या ॲपच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाते यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.मात्र यावेळी प्रताप सरनाईक यांनी संबंधित दुचाकी चालकावर कारवाई करणे टाळले. या ऐवजी सरनाईक यांनी त्या बाईकच्या चालकाला यांनी भाडे म्हणून 500 रुपये देऊ केले. तसेच तुझ्यासारख्या गोरगरिबावर गुन्हा दाखल करून आम्हाला काहीच साध्य होणार नाही. तथापि, या मागे लपलेल्या बड्या धेंडाना शासन झाले पाहिजे! हाच आमचा हेतू आहे. असे सरनाईक यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode