नवी मुंबई, 3 जुलै (हिं.स.)। ऐरोली सेक्टर-20 मधील एका रहिवासी इमारतीच्या संरक्षक भिंतीच्या अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
कोसळलेली भिंत इमारतीच्या कंपाऊंडची असून, काही सेकंदांतच ती जमीनदोस्त झाली. विशेष बाब म्हणजे, या भिंतीच्या बाजूलाच काही दुचाकी उभ्या होत्या. भिंत कोसळल्यानंतर या सर्व दुचाकी थेट बाजूच्या खड्ड्यात कोसळल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आर्थिक नुकसानीची शक्यता वर्तवली जात आहे.घटनास्थळी जवळच एका नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. स्थानिक रहिवाशांच्या आरोपानुसार, या बांधकामामुळे भिंतीच्या बाजूची जमीन सैल झाली होती. सतत चालू असलेल्या खणकामामुळे संरक्षक भिंतीच्या पाया भागावर परिणाम झाला आणि अखेरीस ही दुर्घटना घडली.रहिवाशांनी यापूर्वीही बांधकामाविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या, मात्र त्याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी बांधकाम परवानग्या, सुरक्षेचे नियम आणि देखभाल यांची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. याप्रकरणी नगरविकास विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून कोणती कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule