राज्यात पावसाचा जोर वाढला; कोकण व घाटमाथ्यावरील भागांना ऑरेंज अलर्ट
- मुंबईसह अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट मुंबई, 3 जुलै (हिं.स.)। राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांत राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण व घाटमाथ्याच्या भागात पावसाचा ज
heavy rain


- मुंबईसह अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट

मुंबई, 3 जुलै (हिं.स.)। राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवसांत राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण व घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर अधिक असल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, पालघर, ठाणे, मुंबई आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील इतर भागातही ढगाळ वातावरण राहून हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील घाट विभागात जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे घाट विभागात ऑरेंज अलर्ट तर शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींसह तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे.

गंगेच्या पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशा भागात असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या झारखंड आणि लगतच्या भागांवर स्थिरावला आहे. या प्रणालीसह असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किमी उंचीपर्यंत आहे. पुढील २४ तासांत ही प्रणाली झारखंडच्या दिशेने पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे.

कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. उर्वरित भागात हलक्याफुलक्या सरींसह ढगाळ वातावरण राहिले. बुधवारी सकाळपर्यंत सोलापूर आणि जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हवामान विभागाच्या सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरड कोसळणे, पूरजन्य परिस्थिती आणि विजेच्या कडकडाटासह पावसामुळे वाहतूक व जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande