ठाणे - विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या अनधिकृत शाळांना सील ठोका - आ. केळकर
ठाणे, 3 जुलै, (हिं.स.)। ठाणे, मुंब्रा आणि दिव्यात ८१ अनधिकृत शाळा असून त्यापैकी फक्त तीन शाळांवर कारवाई करण्यात आली. या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असताना अधिकाऱ्यांच्या संगनमताने या शाळांचे पेव फुटल्याचा आरोप आमदार संजय के
ठाणे - विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या अनधिकृत शाळांना सील ठोका - आ. केळकर


ठाणे, 3 जुलै, (हिं.स.)। ठाणे, मुंब्रा आणि दिव्यात ८१ अनधिकृत शाळा असून त्यापैकी फक्त तीन शाळांवर कारवाई करण्यात आली. या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असताना अधिकाऱ्यांच्या संगनमताने या शाळांचे पेव फुटल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केला. या शाळांवर ठोस कारवाई करण्याची गरज असून त्या सील कराव्यात, अशी मागणी त्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.

ठाणे, मुंब्रा, दिवा भागात अनधिकृत शाळांची संख्या ८१ झाली असून त्यातील ७० शाळा एकट्या दिव्यात आहेत. गेल्या २१ महिन्यांत दिव्यात ३९ अनधिकृत शाळांची भर पडली आहे. विशेष म्हणजे या सर्व शाळांच्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करूनही फक्त तीन शाळांवरच कारवाई करण्यात आली आहे. या शाळांना ६५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला असून तो अद्याप जमा करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर येथील अधिकृत शाळांनी बंद पुकारला होता तसेच आमदार केळकर यांना भेटून भूमिका मांडली होती. अनधिकृत शाळांमुळे पालकांचे नुकसान तर होतेच पण विद्यार्थ्यांचेही भविष्यात मोठे नुकसान होणार असल्याने श्री.केळकर यांनी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे या शाळांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून अनधिकृत शाळा अद्याप सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. त्या-त्या यंत्रणा अशा शाळांवर कारवाईची प्रक्रिया करत असतात, पण संगनमतामुळे या शाळा अद्याप सुरूच आहेत, किंबहुना आणखी वाढत असल्याची खंत श्री.केळकर यांनी व्यक्त केली. आतापर्यंत फक्त तीनच शाळांवर कारवाई करण्यात आल्याने झारीतले शुक्राचार्य कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या शाळांची पाणी आणि वीज जोडणी तोडून त्या सील करण्यात याव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे संभाव्य शैक्षणिक नुकसान टळेल, अशी मागणी श्री.केळकर यांनी केली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या वास्तूंचे जतन करण्याची मागणी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जन्मगावी राज्य सरकारने भव्य स्मारकासाठी मोठी तरतूद केली आहे. अहिल्यादेवींनी महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणात केले आहे. त्यांनी सुरू केलेली अन्नछत्रे, बांधलेली मंदिरे, पूल, घाट, किल्ले, वाडे आणि विहिरी या वास्तूंची दुरावस्था झाली असून त्यांची दुरुस्ती करावी, त्या वास्तू जतन कराव्यात, अशी मागणी देखील आमदार संजय केळकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande