रस्त्याच्या डांबरीकरणसाठी २२ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर
रायगड, 3 जुलै (हिं.स.)। अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणसाठी २२ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.त्याचबरोबर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी हालचाली पुन्हा सुरु झाल्या आहेत. यामुळे अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची तसेच स्थानिकांची नेहमीच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्ग हा सुरवातीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होता.आता हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. मात्र हस्तांतरणाची तांत्रिक प्रक्रीया पूर्ण झाली नसल्याचे कारण देत दोन्ही यंत्रणांकडून रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात होते.महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने, वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता.यासंदर्भात पंडितशेठ पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता… या पाठपुराव्याला बैठकीत यश आले असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा आणि चौपदरीकरणासाठी फेरप्रस्ताव सादर करा असे निर्देश यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला दिले.
विधीमंडळात विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या दालनात यासंदर्भातील बैठक बुधवार दि. ३ जुलै रोजी पार पडली.पावसाळ्यानंतर डांबरीकरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे पंडितशेठ पाटील यांनी सांगितले. तर पावसाळ्यातील खड्डे भरण्यासाठी २८ लाख रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. खड्डे भरणे आणि रस्ता दुरुस्तीची कामे लवकरच सुरु होणार आहेत अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे अलिबाग वडखळ महामार्गाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्ह दिसत आहेत.
या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील, उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant