आपला दवाखानाचा ८५ हजार रुग्णांनी घेतला लाभ
रायगड, 30 जुलै (हिं.स.)। राज्य सरकारच्या आपला दवाखाना योजनेला रायगड जिल्हयात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. गोरगरीब रूग्णांना तातडीने मोफत उपचार मिळावेत यासाठी हे दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर वर्षाकाठी ८५ हजार हून अधिक रूग्ण या दवाखान्यातील सेवांचा लाभ घेत आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईसह राज्यभरात 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ही योजना सुरू केली आहे. सुरवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दवाखान्यांचं लोकार्पण करण्यात आलं. मुंबईसह राज्यभरातील महापालिका आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. अगदी ताप,सर्दी अशा आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय टेस्ट करण्यासाठी घरापासून दूर हॉस्पिटल गाठावे लागते. यावर उपाय म्हणून रूग्णांना घरापासून जवळ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे.
ग्रामीण तसंच दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येक छोट्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये यावं लागतं. यामुळे वैद्यकीय उपचाराला उशीर होतोच शिवाय प्रवासाचा खर्च होतो आणि अनेकदा तर राहण्याची गैरसोय सुद्धा होते. ही गैरसोय टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दुसऱ्याबाजूला दैनंदिन रुग्णांमुळे हॉस्पिटलवरील ताण वाढतो ज्याचा थेट परिणाम अपघात विभाग, आयसीयू आणि प्रसूती विभागा अशा तात्काळ उपचार गरजेचा असलेल्या रुग्णांच्या उपचारावर होतो.
रायगड जिल्हयात १८ दवाखाने मंजूर असून त्यापैकी १६ ग्रामीण भागात तर २ दवाखाने पनवेल महानगर पालिका क्षेत्रात आहेत. ग्रामीण भागातील 16 पैकी 6 दवाखाने सरकारी जागेत ती 10 तालुक्यात सध्या भाडयाच्या जागेत हे दवाखाने चालवले जातात. अलिबाग खोपोली महाड पोलादपूर रोहा आणि माथेरान येथे स्वतःच्या जागेत आहेत उर्वरित ठिकाणी साधारणपणे ४० हजार एवढे भाडे भरून हे दवाखाने चालवले जात आहेत. प्रत्येक दवाखान्यात साधारण पाच जणांचे पथक कार्यरत असते. यामध्ये १ वैद्यकीय अधिकारी, १ स्टाफ नर्स, १ आरोग्य सेवक वर्कर, १ क्लर्क आणि १ रिपोर्टींग अशी पाच जणांची टीम एका दवाखान्यात काम करते.
मध्यंतरी कर्मचाऱ्या अभावी महाड येथील दवाखाना बंद होता पण आता नव्याने कर्मचारी नियुक्त करून तो सुरु करण्यात आला आहे. या दवाखान्यातील ओपीडीची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी असते. साधारणपणे रोजचे २५ ते ३० पेशंट तपासले जातात. शिवाय योगा मेडिटेशन यासारखे उपक्रम येथे घेतले जातात. या दवाखान्यांमुळे ग्रामीण भागातील रूग्णांना वेळेत उपचार तर मिळतातच शिवाय त्याच्या वेळेची बचतदेखील होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant