आता काॅंग्रेस मजबूत होणार, मनपाही ताब्यात येणार - प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख
जालना, 30 जुलै (हिं.स.) जिल्ह्यातील काॅंग्रेस पक्षाचे प्रभावी नेते व माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पक्षातरांमुळे काॅंग्रेस पक्षात निर्माण झालेली पोकळी लवकरच भरून निघेल शिवाय पक्ष मजबूत होईल व आगामी जालना महापालिका ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात
..आता काॅंग्रेस पक्ष मजबूत होणार, मनपाही ताब्यात येणार नूतन प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख यांना विश्वास


जालना, 30 जुलै (हिं.स.) जिल्ह्यातील काॅंग्रेस पक्षाचे प्रभावी नेते व माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पक्षातरांमुळे काॅंग्रेस पक्षात निर्माण झालेली पोकळी लवकरच भरून निघेल शिवाय पक्ष मजबूत होईल व आगामी जालना महापालिका ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात येईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे नूतन उपाध्यक्ष तथा भगवान गडाचे विश्वस्त राजेंद्र राख यांनी व्यक्त केला आहे,

पुढे बोलतांना राख म्हणाले की, आपण मूळ काॅंग्रेसच्या विचारसरणीचे आहोत, डॉ. शंकरराव राख हे जालना जिल्ह्यातील वंजारी समाजातील व राख परिवारातील पहिले आमदार व मंत्री होते. धर्मनिरपेक्ष विचारांचा वसा तसेच फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा राख परिवारात आहे.काॅग्रेसची आयडाॅलाजी आमच्या रक्तात आहे. आपण एनएसयुआयच्या जिल्हा सरचिटणीस पदापासून काॅंग्रेस पक्षाच्या कार्यास सुरूवात केली. २००१ मध्ये आपण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होतो, २००७ मध्ये जिल्हा काॅंग्रेसचे सरचिटणीस, पुढे उपाध्यक्ष होतो. जिल्हा काॅंग्रेसचे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी आपण सांभाळत होतो. याशिवाय महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या ओबीसी कोअर कमिटीतही होतो. अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे आपण राष्ट्रीय समन्वयक व गुजरात राज्याचे प्रभारी आहोत. २००१ पासून आपण काॅंग्रेस पक्षाचे युवा नेते राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसमध्ये कार्य केले. पंजाब, मध्यप्रदेश, छत्तीसगढ या राज्यात सातव यांच्या सोबत काॅंग्रेस पक्षाचे कार्य करण्याची आपणास संधी मिळाली. २०१४ साली गुजरातमध्ये आमच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, या हल्ल्यामुळे आम्ही डगमगलो नाही, उलट पक्ष नेतृत्वाच्या पाठबळामुळे आम्ही सक्षम झालो. काॅंग्रेस पक्षात केलेले कार्य लक्षात घेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व काॅंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे, त्याबद्दल आपण या नेते मंडळीचे आभार मानतो. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पक्षांतराबाबत बोलतांना राजेंद्र राख म्हणाले की, कैलास गोरंट्याल हे जालना जिल्ह्यातील काॅंग्रेस पक्षाचे प्रभावी नेते होते, काॅंग्रेस पक्षाने त्यांना जालना विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा उमेदवारी दिली, तीन वेळा आमदार केले शिवाय त्यांच्या पत्नी संगिताताई गोरंट्याल यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. त्या नगराध्यक्ष म्हणून भरघोस मतांनी निवडून आल्या. गोरंट्याल यांचा काॅंग्रेस पक्षाचा राजीनामा देणे ही बाब आपणास वेदनादायी वाटते , त्यांच्या पक्षांतराने काॅंग्रेस पक्षात पोकळी निर्माण होणार हे निश्चित असले तरी ही पोकळी दोन- तीन महिन्यात भरून निघणार आहे, येणाऱ्या काळात काॅंग्रेस पक्षाचे संघटन मजबूत होणार असून अनेक जण पक्षात प्रवेश करणार आहेत, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष घवघवीत यश संपादन करेल, तसेच जालना महानगर पालिकाही काॅंग्रेस पक्षाच्या ताब्यात येईल, असा विश्वासही राख यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / KULKARNI AMIT ANIL


 rajesh pande