बुलडाणा, 31 जुलै (हिं.स.)। राज्य शासनाच्या निर्देशानुसार यावर्षी दि. १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ आणि १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत ‘महसूल सप्ताह २०२५’ साजरा करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या विविध कामकाजाचा आढावा घेणे, उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करणे, तसेच नागरिकांपर्यंत विभागाच्या सेवा आणि योजना पोहोचविणे, या हेतूने सप्ताहभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
महसूल सप्ताहाच्या निमित्ताने महसूल विभागाकडून समाजाच्या विविध घटकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यादरम्यान, महसूल दिनाच्या शुभारंभप्रसंगी कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार, तसेच उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांना विविध योजनांचे प्रमाणपत्रेही वितरीत करण्यात येतील.
सप्ताहाच्या पुढील दिवसांमध्ये २०११ पूर्वीपासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र कुटुंबांना पट्टे वाटप, पाणंद आणि शिवार रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड, मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन, तसेच लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन डिबीटी प्रक्रिया पूर्ण करणे, हे महत्त्वाचे उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवणे, शर्तभंग प्रकरणांबाबत निर्णय घेणे आणि शासनाच्या एम-सॅंड धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून महसूल सप्ताहाची सांगता करण्यात येईल.
राज्य शासनाने महसूल प्रशासनातील पारदर्शकता वाढवून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक दिवशी ठराविक विषयांवर विशेष मोहिमा राबवण्यात येणार आहेत.
१ ते ७ दरम्यान आयोजीत कार्यक्रम :
शुक्रवार १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समांरभ होणार आहे.
शनिवार दि.२ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबाना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रम
रविवार दि.३ ऑगस्ट रोजी पाणंद, शिवरस्त्यांची मोजणी करनु त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे.
सोमवार दि.४ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे.
मंगळवार दि.५ ऑगस्ट रोजी विशेष सहाय योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे.
बुधवार दि.६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार नियमानुकूल करणे, सरकारजमा करणे, निर्णय घेणे.
गुरुवार दि.७ ऑगस्ट एम सॅड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे प्रमाणित कार्यपद्धतीनुसार धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ करण्यात येणार आहे.
नागरिकांनी महसूल विभागाच्या सेवा आणि योजनांचा लाभ घेऊन, महसूल सप्ताहामध्ये सहभागी व्हावे. तसेच, शासनाच्या कार्यपद्धतीबाबत अधिक माहिती मिळवून प्रशासनाशी सक्रिय सहभाग ठेवावा. महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असून, महसूल सप्ताह हे त्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने