नांदेड, 30 जुलै, (हिं.स.)। राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त 'अखिल भारतीय शिक्षण समागम २०२५' या भव्य कार्यक्रमात नवी दिल्ली येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि BOAT (Board of Apprenticeship Training - Western Region) यांच्यात औपचारिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
हा करार कुलगुरू प्रा. डॉ. मनोहर चासकर, प्र कुलगुरू डॉ अशोक महाजन आणि BOAT चे संचालक यांच्यात करण्यात आला. या महत्त्वाच्या प्रसंगी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे उच्च शिक्षण विभागाचे सचिव श्री. विनीत जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार हस्तांतरित करण्यात आला.
उल्लेखनीय बाब म्हणजे, हा सामंजस्य करार विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) च्या अंमलबजावणीला विशेषतः उद्योग क्षेत्रातील अप्रेंटिसशिप टप्प्यावर अधिक बळकटी देईल. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच प्रत्यक्ष उद्योग अनुभव प्राप्त करून देणे, ही या कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
हा करार विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करत विद्यापीठ-उद्योग सुसंवादास नवीन दिशा देणारा ठरेल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis