अमरावती, 30 जुलै (हिं.स.)।
आमदार केवलराम काळे यांच्या संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या नागापूर आश्रमशाळेतील घोर दुर्लक्षामुळे बामदेही येथील कु. सुमती सोमा जामुनकर या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर तब्बल १२ तास उलटूनही ना शाळेतील एकही कर्मचारी उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर येथे पोहचला, ना तिच्या कुटुंबातील कोणी सदस्य तिथे होता. इतकेच नव्हे तर या दुर्घटनेची माहितीही तिच्या आई-वडिलांपासून अद्याप लपवली जात असल्याची चर्चा परिसरात होती.
कु. सुमतीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात रात्रभर स्टेचर्स वर पडून होता. त्यानंतर घटनास्थळी माजी आमदार राजकुमार पटेल, रोहित पटेल, देवीदास कोगे, पंकज मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पोहचले . त्यांनी याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.या प्रकारामुळे नागापूर आश्रमशाळेतील व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषी असलेल्या संबंधितांविरोधात कठोर पावले उचलावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.दुपारी 12 वाजता मुलीचे नातेवाईक व परिवार रुग्णालयात पोहचला त्यावेळी एकच आक्रोश उडाला.
शवविच्छेदन करण्यावरून नातलग संतप्त
आदिवासी आश्रम शाळेत पाण्याची टाकी कोसळून मृत झालेल्या विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी अचलपूर येथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नकार दर्शविला आहे. तर त्यांच्या मूळ धारणी तालुक्यातच मृत मुलीचे शवविच्छेदन व्हावे; अशी मृत मुलीच्या नातेवाईकांची मागणी आहे. यामुळे उपजिल्हा रुग्णालयात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. याठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील आहे.
तोडगा काढण्याची मागणी
दरम्यान मृत मुलीचे नातेवाईक संतप्त झाले असून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच नातेवाईकांचा मोठा जमाव जमला असून येथे गोंधळाचे वातावरण आहे. तर संस्था चालकांनी समोरासमोर येऊन त्यांच्या नातेवाईकांसोबत चर्चा करून तोडगा काढावा अशी मागणी माजी आमदार राजकुमार पटेल यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी