मुंबई, 30 जुलै (हिं.स.)। दिल्लीतील सदर बाजार परिसरातील १३, ११ आणि ९ वर्षे वयोगटातील तीन मुले सलमान खानला भेटण्यासाठी घर सोडून निघाल्यानंतर नाशिक येथे सुखरूप सापडली आहेत. २५ जुलै रोजी ही मुले अचानक बेपत्ता झाली होती. चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी तिन्ही मुलांना नाशिक रेल्वे स्थानकावरून सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही मुलांची ओळख महाराष्ट्रातील जालना येथील वाहीद नावाच्या तरुणाशी ‘फ्री फायर’ या ऑनलाइन गेमिंग अॅपवर झाली होती. वाहीदने मुलांना तो सलमान खानला भेटल्याचा दावा करत त्यांची भेट घडवून आणू शकतो असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुलांनी जालना आणि नंतर मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
मुलांनी कुटुंबियांना न सांगता घरातून निघाले. त्यांच्या घरातून पोलिसांना एक हस्तलिखित चिठ्ठी मिळाली ज्यात त्यांनी वाहीदला भेटण्यासाठी जालन्याकडे जात असल्याचे लिहिले होते. हा तपासातील महत्त्वाचा धागा ठरला.
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना मुले अजमेरी गेटजवळ दिसली. यावरून ते नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून 'सचखंड एक्सप्रेस'ने महाराष्ट्राच्या दिशेने निघाले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला. ही मुले तिकिटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास करत असल्याचेही समजले.
प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्याचे लक्षात आल्यानंतर वाहीदने मुलांना भेटण्याचा निर्णय बदलला. त्यामुळे मुलांनी जालना न जाता नाशिक येथे उतरायचे ठरवले. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी मुलांचा ठावठिकाणा लावला.
दिल्ली पोलिसांनी रेल्वे पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम राबवली. चार दिवसांच्या शोधानंतर मंगळवारी तिन्ही मुले नाशिक रेल्वे स्थानकावर सापडली. सध्या ती पूर्णपणे सुरक्षित असून त्यांना दिल्लीला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी या घटनेविषयी सांगितले की, बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या क्रेझमुळे मुलांनी हा धोकादायक निर्णय घेतला. सुदैवाने ती वेळेत सापडली असून आता ती आपल्या कुटुंबासोबत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule