
अकोला, 31 जुलै (हिं.स.) : रतनलाल प्लॉट चौक ते उमरी, जठारपेठ हा अतिशय वर्दळीचा मार्ग असून सध्या या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर झालेल्या जॉइंट उघड्या अवस्थेत असून, त्यामध्ये मोकळेपणाने खोल खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनांचे टायर अडकून रोज अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.या रस्त्यावरून शाळा, कॉलेज, बाजारपेठेत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, महिला आणि नागरिक ये-जा करतात. त्यामुळे अनेक वेळा लहान-मोठ्या अपघातांची नोंद झाली आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी अकोला महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांच्याकडे तातडीने रस्त्याच्या जॉइंटची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. भविष्यात मोठा अपघात घडू नये यासाठी त्वरीत दखल घेऊन रस्त्याची सुधारणा करावी, असे त्यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे. या निवेदनावर प्रणव गौड, निलेश अग्रवाल,नंदू शेटे, अनिल हेडाऊ,योगेश कुळकर्णी,किशोर घोडे, निनाद खपली, विठ्ठल मानकर, सनी बांगर,मनोज अग्रवाल, मुकुंद डोंगरे यांसह परिसरातील व्यावसायिक व नागरिकांच्या सह्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे