रत्नागिरी, 31 ऑगस्ट, (हिं. स.) : बिहारमधील अरेरिया पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातून हरवलेली महिला पिंकीदेवी राजेशकुमार देहाती (वय 46, रा. वॉर्ड क्रमांक 9, शिवपुरी, जि. अरेरिया, बिहार) आज पाचल (ता. राजापूर) बाजारपेठ परिसरात सापडली.
ती सापडल्यावर तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता, त्यांना रत्नागिरीत पोहोचण्यासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित महिलेस रत्नागिरीत पोलिसांच्या सखी वन स्टॉपमध्ये दाखल करण्यात आले.
राजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार कमलाकर पाटील, कॉन्स्टेबल रामदास पाटील व रामकृष्ण कात्रे यांच्या प्रयत्नातून ही महिला लवकरच आपल्या मूळ गावी परतण्याची शक्यता आहे.
बिहारमधील महिला राजापूरच्या ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचली, याची माहिती मात्र उपलब्ध होऊ शकली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी