अमरावती, 31 जुलै (हिं.स.)।
सात वर्षांपूर्वी झालेल्या वनरक्षक भरतीमध्ये लेखी परीक्षा व मैदानी चाचणीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट होताच वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा निरंजन हरणे (वय ४४) यांनी नांदगाव पेठ ठाण्यात तक्रार दिली. त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रदीप बदामसिंग सुलाने (वय २७, रा. नळणी वाडी, ता. भोकरदन जि. जालना) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
सन २०१९ मध्ये पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पोलीस भरतीमध्ये काही उमेदवारांनी लेखी व मैदानी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले होते. तेव्हा ४ जानेवारी २०२२ रोजी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. यामध्ये प्रदीप सुलाने हा सुध्दा आरोपी होता. तसेच सन २०१८ रोजी आरोपीने अमरावतीमध्ये झालेल्या वनरक्षक पदाची भरतीसुध्दा दिली. तेव्हा भरती दरम्यान त्याने लेखी चाचणीमध्ये स्पाय ब्लू टूथ डिवाईसचा वापर केला आणि मैदानी चाचणीच्या वेळी स्वतःच्या जागेवर चुलत भाऊ पझसिंग पुनमसिंग बमनावत याला डमी उमेदवार म्हणून पाठवून मैदानी चाचणी दिली आणि उत्तीर्ण झाला. परंतु मुख्य वनसंरक्षक कार्यालय अंतर्गत नेमलेल्या समितीच्या चौकशीमध्ये कसून पाहणी करण्यात आली. तसेच मैदानी चाचणी दरम्यानचे व्हिडिओ फुटेज तपासण्यात आले. तेव्हा आरोपीच्या जागी दुसरा इसम घाव चाचणीत दिसून आला. त्यामुळे आरोपीने वनरक्षक भरती प्रकियामध्ये गैरमार्गाचा अवलंब करून वनरक्षक पदावर गैरकायदेशीर मार्गाने नियुक्ती मिळविली असल्याचे निष्पन्न होताच वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी नांदगाव पेठ ठाण्यात तक्रार दिली. त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी