अलिबाग, 1 ऑगस्ट, (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील मुरुड पोलिस स्टेशन हद्दीत पर्यटन प्रिय असणाऱ्या काशीद समुद्र किनाऱ्यावर पंचावन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचे अकरा किलो एकशे अठ्ठेचाळीस ग्राम वजनाचे अंमली पदार्थ असलेली पाकिटे सापडली असल्याच्या वृत्ताने मुरुड तालुक्यासहित रायगड बरोबर कोकण किनारपट्टीवर एकच खळबळ उडाली आहे.
कोकण किनार पट्टीवर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम चरस पाकीट वाहून आली होती. त्यानंतर दोन दिवसांनी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनारी सर्वप्रथम चरस पाकीट वाहून आल्यानंतर काही दिवसांत म्हसळा, मुरुड, अलिबाग तालुक्यातील समुद्र किनारी कोट्यवधी रुपयांची चरस पाकीटे वाहून आली.
मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनारी काही संशयास्पद स्थितीत प्लास्टिक गोणी दिसत असल्याची माहिती ही मुरुड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांना प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी त्वरित त्याची माहिती अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा खेतमालीस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांना दिली. पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, पोलिस स्टेशन मधील अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा खेतमालीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या सूचनेनुसार मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे हे पोलिस स्टेशन मधील पोलिस उप निरीक्षक अविनाश पाटील, पोलिस हवालदार जनार्दन गदमले, हरी मेंगाळ, पोलिस शिपाई मकरंद पाटील, निखिल सुर्ते, कैलास निमसे, संतोष मराडे, सुमित उकार्डे यांच्यासहित काशीद समुद्र किनारी दाखल झाले. त्यांनी काशीद समुद्रकिनारी येथे संशयास्पद प्लास्टिक गोणीचे निरीक्षण करीत गोणीत काय आहे याची खातर जमा करण्यासाठी गोणीचे तोंड उघडले असता त्यामध्ये चरस सदृश्य अंमली पदार्थ मिळून आले. पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी त्याचा पंचनामा केला असता त्याचे वजन अकरा किलो एकशे अठ्ठेचाळीस ग्राम इतके झाले असून त्याचे बाजार मूल्य ही पंचावन्न लाख चौऱ्याहत्तरहजार रुपये इतकी झाली आहे.
याबाबत मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा रजि.नं ५९/२०२५ एन.डी.पी.एस कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (क), २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी काही ठिकाणी चरस समुद्रकिनारी लागण्याची शक्यता असल्याने रायगड पोलीसांनी सागरी किनारे पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक मच्छीमार, ग्राम रक्षक दल, सागरी रक्षक दल, तटरक्षक दलाच्या मदतीने पोलीस शोधाशोध घेत आहेत. सागरी किनारी असलेल्या पोलीस ठाण्यामार्फत शोध मोहीम सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sandesh Jaywant