अमरावती, 1 ऑगस्ट (हिं.स.) कर्तव्यावरील पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदारपुत्र तथा धारणी बाजार समितीचे सभापती रोहित राजकुमार पटेल याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चिखलदरा पोलिसांनी गुरुवारी दुपारी माजी आमदार राजकुमार पटेल, मन्ना दारसिंबे, सुनील उईके, रघुवीर सतवासे, गणेश बेठेकर, देवीदास कोगे व त्यांच्या ३०० ते ४०० सहकाऱ्यांविरुद्ध बेकायदेशीररीत्या रास्ता रोको, सार्वजनिक वाहतूक अडवणे व मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल केलेत.
चिखलदरा तालुक्यातील नागापूरस्थित वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळा येथे २९ जुलै रोजी पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडल्यामुळे त्या शाळेतील १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ३० जुलै रोजी त्या मुलीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पार्थिव मुलीच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. प्रेत अंत्यसंस्कारासाठी मुलीच्या मूळ गावी गांगरखेडा येथे न नेता ते धारणी प्रकल्प अधिकारी कार्यालयात नेऊन मृत मुलीच्या परिवारास जोपर्यंत ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यंत तिचे प्रेत प्रकल्प अधिकारी कार्यालयातच ठेवून आंदोलन करणार, अशी भूमिका माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचा मुलगा रोहित यांनी घेतली.
पोलिसांशी हुज्जत
बुधवारी राजकुमार पटेल, रोहित पटेल व इतरांनी घटांग टी-पॉइंट येथे विनापरवानगी सार्वजनिक रस्ता अडवून मुलीचे प्रेत रस्त्यावर ठेवले. प्रकल्प अधिकारी कार्यालयात जाऊ द्या; अन्यथा आम्ही प्रेत घेऊन इथेच बसतो, असे म्हणत पोलिसांशी हुज्जत घातली. रास्तारोको केला.थोड्या वेळाने राजकुमार पटेल हे त्यांच्या सहकाऱ्यांसह मुलीचे प्रेत हातात घेऊन धारणी रोडने धावत निघाले. ते प्रेत रोहित पटेल चालवत असलेल्या वाहनात ठेवले तथा धारणीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला.
रोहित पटेलला अटक
एफआयआरनुसार, रोहित पटेल याने त्याची कार जीव घेण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न केला. ते वाहन पुढे रोरा फाट्याजवळ पोलिसांनी थांबविले. त्यानंतर पोलिसांनी राजकुमार पटेल व रोहित पटेल यांना ताब्यात घेऊन त्यांना चिखलदरा ठाण्यात आणले. गुरुवारी गंगारखेडा येथे त्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी दुपारी गुन्हा दाखल केल्यानंतर रोहित पटेल याला गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर राजकुमार पटेल यांना रुग्णालयात हलविण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी