मुंबई, 31 जुलै (हिं.स.) : नाशिकच्या मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सर्व 7 आरोपींची मुक्तता करण्यात आली. एनआयए विशेष न्यायालयाचे न्या. ए.के. लाहोटी यांनी आज, गुरुवारी दिलेल्या निकालात सर्व 7 जणांची पुराव्या अभावी सुटका केली. यामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील मशिदीजवळ 29 सप्टेंबर 2008 रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन 6 जण ठार आणि 100 हून अधिक जखमी झाले होते. सुरूवातीला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणाचा तपास केला होता. त्यानंतर, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, नंतर एनआयएकडे वर्ग करण्यात आला. प्रकरणाच्या तपासाची सूत्रे घेतल्यानंतर एनआयएने 2016 मध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यात, साध्वी यांच्यासह श्याम साहू, प्रवीण टाकळकी आणि शिवनारायण कलसंग्रा यांच्याविरोधात पुरावे नसल्याचा दावा करून त्यांना दोषमुक्त करण्याची मागणी एनआयएने केली होती. तथापि, साध्वीविरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे स्पष्ट करून विशेष न्यायालयाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर दहशवादाचा आरोप निश्चित केला होता.प्रदीर्घ काळानंतर ऑक्टोबर 2018 मध्ये विशेष एनआयए न्यायालयाने आरोपींवर दहशतवादाच्या आरोपांतर्गत आरोपनिश्चिती केली आणि खटल्याच्या नियमित सुनावणीला अखेर सुरुवात झाली. सात वर्षांच्या सुनावणीनंतर 19 एप्रिल 2025 रोजी फिर्यादी आणि आरोपींचा युक्तिवाद पूर्ण झाल्याचे जाहीर करून खटल्याचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणी विशेष न्यायालयाने गुरूवारी उपरोक्त निकाल दिला.
खटला सुरू असताना प्रकरणातील सगळ्या आरोपींना उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यामुळे, सगळे आरोपी जामिनावर बाहेर होते. आरोपींविरोधात यूएपीए कलम 16 (दहशतवादी कृत्य करणे) आणि 18 (दहशतवादी कृत्याचा कट रचणे) 120 (ब) (गुन्हेगारी कट), 302 (खून), 307 (खून करण्याचा प्रयत्न), 324 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 153 (अ) (दोन धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आदी भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत खटला चालवण्यात आला. या खटल्यात एनआयएतर्फे 323 साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवण्यात आले, तर आरोपपत्रात उल्लेख असलेल्या जवळपास 30 हून अधिक साक्षीदारांची साक्ष देण्यापूर्वीच मृत्यू झाला. याशिवाय, त्यापैकी 34 साक्षीदार फितूर झाले. हे साक्षीदार पुरोहित आणि कथित कट रचण्याच्या बैठकांशी संबंधित होते. तथापि, बॉम्बस्फोटांचा कट रचण्याबद्दल आरोपींनी केलेल्या कोणत्याही चर्चेत आपण सहभागी झाल्याचे किंवा ही चर्चा ऐकल्याचे या साक्षीदारांनी नाकारले. प्रकरणाचा सुरुवातीचा तपास करणाऱ्या राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जबरदस्तीने, बेकायदेशीररित्या आपल्याला ताब्यात घेतले आणि काही व्यक्तींची नावे सांगण्यास, खोटे विधान करण्यास धमकावल्याचा आरोपही या साक्षीदारांनी साक्ष नोंदवताना केला होता.
त्यासोबतच मालेगावातील बॉम्बस्फोट मोटरसायकलमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले. आरडीएक्स प्रसाद पुरोहित यांनी पुरवले हे सिद्ध होऊ शकलेले नाही. त्याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध झाले नाहीत. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणाहून वैज्ञानिक पुरावे जमा केले गेले नाहीत. साध्वीच्या मोटाईसायकलचा स्फोट झाल्याचा आरोप आहे. पण ही मोटारसायकल तिच्या मालकीची असल्याचे सिद्ध करण्यात अपयश आल्याचे न्यायालयाने आरोपींची सुटका करताना स्पष्ट केले आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी