अमरावती, 31 जुलै (हिं.स.)।
वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विर्शी गावात जागेच्या वादातून एका महिलेला निर्घृण मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शारदा बाभुळकर या महिलेवर चार जणांनी एकत्र येऊन प्राणघातक हल्ला केला. यामध्ये तीन पुरुष आणि एक महिला सामील असून, व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की एक महिला हातात काठी घेऊन शारदा बाभुळकर यांना बेदम मारहाण करत आहे. त्याचवेळी अन्य तिघे इसम त्यांच्या केसांना धरून लाथाबुक्क्यांनी मारत असल्याचे व्हिडिओत दिसून येते.
हा प्रकार केवळ वैयक्तिक शत्रुत्वातून नव्हे तर जागेच्या जुन्या वादातून घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या मारहाणीमुळे पीडित महिलेच्या शरीराजवळ गंभीर जखमा झाल्या असून, तिला तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
वलगाव पोलीस स्टेशनमध्ये या चारही आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी