तर, अमरावती नशेच्या गर्तेत जाईल - आ. संजय खोडके
अमरावती, 4 जुलै (हिं.स.) राज्यात होत असलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थाच्या विरोधात शासनाने कठोर धोरण अवलंबिले असून कारवायांबाबत प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आले असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधि
अमरावती शहरात ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कडक धोरण अवलंबिले नाही तर अमरावती नशेच्या गर्तेत जाईल   पावसाळी अधिवेशनात आ.संजय खोडके यांनी लक्षवेधी मांडून व्यक्त केली चिंता


अमरावती, 4 जुलै (हिं.स.)

राज्यात होत असलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थाच्या विरोधात शासनाने कठोर धोरण अवलंबिले असून कारवायांबाबत प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आले असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील चर्चेदरम्यान केली होती. याचे पडसाद विधान परिषदेच्या सभागृहातही उमटले असता आ. संजय खोडके यांनी अमरावती शहरात ड्रग्स व अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असून यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे सांगितले. इतकेच नाहीतर अमरावतीसारख्या लहान शहरामध्ये मादक पदार्थांच्या तस्करीच्या केसेस वाढत असल्याने त्यांना पोलीस विभागाकडूनच वरदहस्त मिळत आहे का ? असा संशय व्यक्त करीत गृहविभागाने यावर कठोर पाऊले उचलून उपाययोजना करण्याची लक्षवेधी सूचना आ. संजय खोडके यांनी केली.

अधिवेशनात बोलत असतांना आ.संजय खोडके म्हणाले कि, अमरावती शहरामध्ये एकाच वर्षात ड्रग्स व मादक पदार्थ तस्करीचे ३१ प्रकरणं समोर आली आहेत. आणि तेही जास्तीत जास्त प्रकरणं हे एकाच पोलीस स्टेशन अंतर्गत घडत आहे. म्हणजेच याचा अर्थ एकदा अंमली पदार्थानी विक्री करणारा माणूस कार्यवाही होऊन देखील पुन्हा पुन्हा तोच धंदा करत आहे. यात एक साखळी निर्माण झाली असून आता अंमली पदार्थ आणण्यासाठी मूळ अड्ड्यावर जाण्याची गरज नसून काही अल्पवयीन मुळे थेट घरपोच अथवा हॉटेल्स व महाविद्यालया पर्यंत अंमली पदार्थ पोहोचवित आहे. यामध्ये पोलीस कारवाईत ५० ग्रॅमच्या वर ड्रग्स बाळगली तर त्याप्रकरणात लगेच जामीन मंजूर होते. त्यामुळे अशा प्रकारावर कुणाचाही अंकुश राहिला नाही. अमरावती शहर लहान आहे. त्यामुळे कुठे काय सुरु आहे. व त्यात कोण सहभागी आहे हे सुद्धा पोलिसांचे खुफिया व बिट जमादार यांना सर्वांना माहित असतांना याकडे डोळेझाकपणा व दुर्लक्ष केलं जात असल्याने अमरावती शहरात वाढत्या ड्रग्स व मादक पदार्थ तस्करीमध्ये पोलिसांकडूनच अभय दिला जात असल्याची सारशंका सुद्धा उपस्थित केली जात आहे. त्यामुळे हे असेच सुरु राहिले तर अमरावती शहर हे नशेचा गर्तेत गेल्या शिवाय राहणार नाही व नवी पिढी बर्बाद होईल, अशी चिंता आ. संजय खोडके यांनी सभागृहात लक्षवेधी मांडतांना व्यक्त केली. तसेच यावर अंकुश लावण्यासाठी कडक धोरण अवलंबिण्यात यावे व अमरावती पोलीस आयुक्तांना याबाबतीत सूचना देण्यात यावी, अशी मागणी सभागृहासमक्ष केली.

यावर उत्तर देतांना राज्याचे मुखमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, अमरावती शहरातील ड्रग्स व मादक पदार्थ तस्करीच्या वाढत्या प्रकरणात आपण स्वतः अमरावती पोलीस आयुक्तांशी चर्चा करून त्यांना या विरोधात कठोर धोरण अवलंबण्याचे निर्देशित करू. तसेच अल्पवयीनांचा सहभाग असल्यास त्यांच्या संबंध कुणाशी लागला त्यालाही दोषी धरून कार्यवाही करण्यात येईल असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. तसेच ड्रग्स व मादक पदार्थाबाबत एनडीपीएस अधिनियमांतर्गत कारवाई करतांना कमर्शियल क्वान्टिटी संदर्भातही केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. ज्यामध्ये कारवाईतील ड्रग्सचे प्रमाण जे मोठे आहे ते कमी करता यावे म्हणजेच छोट्या प्रमाणात ड्रग्स व मादक पदार्थ बाळगण्याला कमी प्रमाणात समजून ते विक्रीच्या संदर्भात बाळगले असे गृहीत धरून शिक्षेस पात्र राहणार आहे. या दिशेने सुद्धा गृह खात्याचे प्रयत्न असल्याचे उत्तर फडणवीस यांनी दिले.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande