सोलापूर, 4 जुलै (हिं.स.)। फताटेवाडी येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्प परिसरात शुक्रवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या शेतकरी कुटुंबातील मिथुन धनु राठोड (वय ४०) यांनी गळफास घेऊन जीवन संपवले आहे.
वाढीव मोबदला मिळण्यास होणारा विलंब आणि कंत्राटी नोकरीसाठी दलालाने पैशांची मागणी केल्याने आलेल्या नैराश्यातून मिथुन यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मिथुन यांचा मृतदेह थेट एनटीपीसी प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवून आंदोलन सुरू केले आहे.
कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या माहितीनुसार, मिथुन राठोड हे एनटीपीसीचे प्रकल्पग्रस्त शेतकरी होते. त्यांना प्रकल्पाकडून वाढीव मोबदल्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते, मात्र ती देण्यास विलंब होत होता. त्याचबरोबर, प्रकल्पात कंत्राटी कामगार म्हणून नोकरी मिळवण्यासाठी एका दलालाने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या मिथुन यांना ही रक्कम देणे शक्य नव्हते. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना डावलून बाहेरील लोकांना नोकऱ्या दिल्या जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. नोकरी न मिळाल्याने आणि आर्थिक संकटामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी जीवन संपवले, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड