नाशिक, 4 जुलै (हिं.स.)।
महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन आणि नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डी. एस. एफ. स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या सहकार्याने नाशिकच्या पंचवटी येथील स्व. मीनाताई ठाकरे, विभागीय क्रीडा संकुल येथे ५ ते ७ जुलै दरम्यान ७ व्या चाईल्ड काप आणि १३ व्या मिनी गटाच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून विविध राज्यांचे ३९० खेळाडू सहभागी होणार आहेत. यांमध्ये महाराष्ट्रसह जम्मू - काश्मीर, पंजाब, हरियाणा , तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, गुजराथ, दिव - दमण, मणिपूर, आसाम, बिहार, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, ओरिसा, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ आदि राज्यांचा समावेश आहे. या स्पर्धेचे उदघाटन उद्या ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सिमा शुल्क खात्याचे उपआयुक्त अजित दान, आणि आशियाई तलवारबाजी असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांच्या हस्ते कारणात येणार आहे. यावेळी सिग्नेचर इंटरनॅशनल फूड लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर यतीन पटेल, नाशिक जिल्हा ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे मेंटॉर अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे सचिव डॉ. उदय डोंगरे, छत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे आदी मान्यवर उपस्तित राहणार आहेत. चाईल्ड (१० वर्षे) आणि मिनी (१४ वर्षे) या वयोगटा पासूनच खेळाडूंना स्पर्धेचा सराव मिळाला तर नक्कीच खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत आणि ऑलिम्पिक पर्यंत मजल मारू शकतील या उद्देशांनेच या दोन गटांच्या स्पर्धचे प्रथम नाशिकमध्येच १३वर्षापूर्वी शुभारंभ करण्यात आला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक उत्तम दर्जेदार खेळाडू घडले आहेत, असे दिसून येत आहे. या स्पर्धाला नाशिकच्या क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI