नवी दिल्ली , 4 जुलै (हिं.स.)। आशियाई करंडक व ज्युनियर हॉकी विश्वकरंडकात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचा हॉकी संघ भारतात येणार आहे. याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले की, आशियाई करंडक व ज्युनियर विश्वकरंडक यामध्ये सहभागी होण्यापासून पाकिस्तानला आम्ही रोखू शकत नाही.असे केल्यास ऑलिंपिक कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका भारताला लागेल.
भारतात एखादी दोन पेक्षा जास्त संघाचा सहभाग असलेली स्पर्धा आयोजित करण्यात आल्यास त्यामध्ये सहभागी होण्यापासून कोणत्याही संघाला रोखू शकत नाही. या नियमानुसार, पाकिस्तानला आशियाई करंडक व ज्युनियर हॉकी विश्वकरंडक या स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखल्यास ऑलिंपिक कायद्याचे उल्लंघन होईल. आणि ऑलिंपिक नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका आपल्या देशावर पडेल. मात्र द्विपक्षीय मालिकेला आमचा विरोध कायम असणार आहे.असे, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
आशियाई हॉकी करंडकाचे आयोजन बिहार येथील राजगिर येथे होणार आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे. तसेच ज्युनियर हॉकी विश्वकरंडक चेन्नई, मदुराई येथे २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर यादरम्यान पार पडणार आहे.या वेळी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांकडून पुढे सांगण्यात आले की, येत्या सप्टेंबर महिन्यात ज्युनियर नेमबाजी विश्वकरंडकाचे आयोजनही भारतात होणार आहे. तसेच जागतिक पॅरा ॲथलीट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजनही करण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धांमध्येही पाकिस्तानच्या खेळाडूंना हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode