जळगाव, 5 जुलै (हिं.स.) पाचोरा शहरातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. अज्ञात मारेकऱ्यांनी 26 वर्षीय तरुणावर गोळीबार केलं त्याचा जागीच मृत्यू झाला. आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असं गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहे. पाचोरा शहरात असलेल्या बस स्थानक परिसरात आज संध्याकाळी दोन संशयित मारेकरी दुचाकीवरून आले आणि त्यांनी आकाश मोरेवर सिनेस्टाईल गोळ्या झाडल्या. नंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले. यावेळेला नागरिकांची धावपळ उडाली. पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन जागा सील केली. त्यांनी तात्काळ पंचनामा करून आकाश मोरेला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. शहरात नाकाबंदी सुरू असून मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर