माँट्रियल, 1 ऑगस्ट, (हिं.स.) – अमेरिकेची अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेली कोको गॉफ हिने नॅशनल बँक ओपन (कनाडियन ओपन) स्पर्धेत कठीण परिस्थितीत उत्कृष्ट लढा देत प्री-क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला.
रशियाच्या वेरोनिका कुदेरमेतोव्हा विरोधात झालेल्या सामन्यात गॉफने तब्बल 14 डबल फॉल्ट केले, तरीही ती 4-6, 7-5, 6-2 असा विजय मिळवण्यात यशस्वी ठरली.
सामन्यानंतर गॉफ म्हणाली, हा खरोखरच कठीण सामना होता. मी मानसिकदृष्ट्या खंबीर राहिले, विशेषतः रिटर्न गेममध्ये. माझ्या सर्व्हिसमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, पण सध्या मी विजयाने खूश आहे.
फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर गॉफ बर्लिन आणि विम्बलडनमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झाली होती. त्यामुळे हा विजय तिच्या आत्मविश्वासासाठी महत्त्वाचा ठरला. ती पुढे म्हणाली, जेव्हा माझ्या खेळात काही त्रुटी असतात आणि तरीही मी सामना जिंकते, तेव्हा विचार करा – जेव्हा सर्व काही सुरळीत असेल, तेव्हा मी काय करू शकेन.
आता गॉफचा सामना 18 वर्षीय कॅनडाची खेळाडू विक्टोरिया मबोकोसोबत होणार आहे. मबोकोने मारी बौजकोव्हाला 1-6, 6-3, 6-0 ने पराभूत केले. मबोको ही स्पर्धेत उरलेली शेवटची कॅनडियन खेळाडू आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या मॅकार्टनी केसलरने चौथी मानांकित रशियन खेळाडू मिर्रा आंद्रेवा हिला 7-6 (5), 6-4 ने पराभूत केले. आता केसलरचा सामना युक्रेनच्या मार्ता कोस्त्युकसोबत होणार आहे. कोस्त्युकने ऑस्ट्रेलियाच्या 15व्या मानांकित डारिया कसात्किनाला 3-6, 6-3, 7-6 (4) ने हरवले.
युक्रेनच्या दयाना यास्त्रेम्सकाने आठव्या मानांकित एमा नवारो हिला 7-5, 6-4 ने पराभूत केले. आता तिचा सामना कझाकिस्तानच्या नवव्या मानांकित एलेना राइबाकिनाशी होणार आहे, जिने रोमानियाच्या जॅकलीन क्रिस्टियन हिला 6-0, 7-6 (5) ने हरवले.
दहाव्या मानांकित युक्रेनची एलीना स्वितोलिनाने रशियाच्या कमिला राखिमोव्हा हिला 7-5, 6-2 ने पराभूत करत पुढील फेरीत प्रवेश केला.
यापूर्वी अमेरिकन खेळाडू डॅनिएल कॉलिन्सविरुद्ध 23 डबल फॉल्ट आणि तीन सेटच्या थरारक सामन्यातून गेलेली गॉफ हिने याही सामन्यात एका सेट आणि ब्रेकने पिछाडीवर असतानाही शानदार पुनरागमन करत अंतिम-16 मध्ये स्थान मिळवले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर