वॉशिंग्टन, 3 ऑगस्ट, (हिं.स.)
जेसन होल्डरच्या दमदार गोलंदाजीमुळे वेस्ट
इंडिजने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा २ विकेट्सने पराभव केला. नाणेफेक
जिंकल्यानंतर पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९
विकेट्स गमावून १३३ धावा केल्या. प्रत्युत्तरा दाखल वेस्ट इंडिजने २० षटकांत ८
विकेट्स गमावून १३५ धावा केल्या आणि सामना जिंकला. या विजयासह वेस्ट इंडिज संघाने
तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
पाकिस्तानने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात
खूपच निराशाजनक होती. संघाने पहिली विकेट फक्त ७ धावांवर गमावली. पहिल्या
विकेटनंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पूर्णपणे वर्चस्व गाजवले. लवकरच वेस्ट इंडिजची
धावसंख्या ७० धावांत ५ विकेट्स अशी झाली होती. यानंतर गुडाकेश मोती संघाच्या
मदतीला धावून आला आणि त्याने २८ धावांची खेळी खेळली. वेस्ट इंडिजच्या डावात मोती
हा सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू ठरला. अखेर जेसन होल्डरने १० चेंडूत १६ धावा करत
पाकिस्तानच्या संघाकडून विजय हिसकावून घेतला.
पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात
जेसन होल्डर आणि गुडाकेश मोती हे विजयाचे हिरो होते. फलंदाजीपूर्वी या दोन्ही क्रिकेटपटूंनी
संघासाठी आपल्या गोलंदाजीने कमाल केली. वेस्ट इंडिजसाठी जेसन होल्डरने ४ षटकांत १९
धावा देत ४ बळी घेतले. याशिवाय गुडाकेश मोतीने ४ षटकांत ३९ धावा देत २ बळी घेतले. ज्यामुळे पाकिस्तानचा संघ फक्त १३३ धावाच करू
शकला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra