मुंबई, 1 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गजांना खास सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीए ने जाहीर केले आहे की मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियममध्ये लवकरच सुनील गावसकर आणि शरद पवार यांच्या मूर्ती उभारल्या जातील. या मूर्ती नुकत्याच बांधण्यात आलेल्या एमसीए क्रिकेट म्युझियमच्या प्रवेशद्वारावर लावण्यात येणार आहेत.
एमसीए कडून उभारण्यात येत असलेल्या या क्रिकेट संग्रहालयाचे नाव “ एमसीए शरद पवार क्रिकेट म्युझियम” असे ठेवण्यात आले आहे, ज्याचे उद्घाटन जुलैच्या अखेरीस करण्यात येणार आहे. या संग्रहालयात फक्त सुनील गावसकरच नव्हे, तर बीसीसीआय आणि एमसीए चे माजी अध्यक्ष शरद पवार यांचीही मूर्ती लावण्यात येणार आहे. या म्युझियममध्ये मुंबई आणि भारतासाठी क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या दिग्गजांची कथा, त्यांची कर्तृत्वगाथा आणि संस्मरणीय क्षण जतन करण्यात येणार आहेत.
एमसीए ने माहिती दिली आहे की, सुनील गावसकर यांची मूर्ती या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर उभारली जाईल. भारताचे माजी कर्णधार आणि ‘लिटिल मास्टर’ म्हणून ओळखले जाणारे गावसकर यांनी या सन्मानावर भावूक प्रतिक्रिया दिली आणि एमसीए चे आभार मानले. त्यांनी म्हटले, “हा सन्मान माझ्यासाठी किती मोठा आहे, हे मी शब्दांत सांगू शकत नाही. मी खूप आनंदित आहे आणि अभिमान वाटतो. एमसीए ही माझी मातृसंस्था आहे, जिच्यामुळे मला क्रिकेटचे पहिले व्यासपीठ मिळाले. आज त्याच संस्थेने मला इतका मोठा सन्मान दिला आहे. माझ्या करिअरमधील हा एक अत्यंत खास क्षण आहे.”
एमसीए ने हे संग्रहालय बीसीसीआय चे माजी अध्यक्ष, एमसीए चे अध्यक्ष आणि सध्या एनसीपी प्रमुख असलेल्या शरद पवार यांच्या नावाने समर्पित केले आहे. क्रिकेट प्रशासनातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाच्या पार्श्वभूमीवर हे संग्रहालय त्यांच्या विचारसरणीला आणि दूरदृष्टीला गौरव देणारे ठरेल.मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणाले की, हे संग्रहालय मुंबई क्रिकेटच्या परंपरेचा आणि गौरवाचा परिचय करून देणारे ठरेल. गावसकर यांची मूर्ती संघर्ष, समर्पण आणि दृढनिश्चय यांचे प्रतीक असेल. ती तरुण खेळाडूंना मोठे स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रेरणा देईल. शरद पवार यांचे योगदानही कायमचे स्मरणात राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode