वॉशिंग्टन, 1 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील २५% टॅरिफ ७ दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. जो आजपासून लागू होणार होता, तो आता ७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. ट्रम्प यांनी गुरुवारी ९२ देशांवरील नवीन टॅरिफची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतावर २५% आणि पाकिस्तानवर १९% कर लादण्यात आला आहे. तथापि, आजपासून कॅनडावर ३५% कर लागू करण्यात आला आहे.
दक्षिण आशियातील सर्वात कमी कर पाकिस्तानवर लादण्यात आला आहे. अमेरिकेने यापूर्वी पाकिस्तानवर २९% कर लादला होता. यापूर्वी, ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी जगभरातील देशांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती, परंतु केवळ ७ दिवसांनी ती ९० दिवसांसाठी पुढे ढकलली. काही दिवसांनी ट्रम्प यांनी ३१ जुलैपर्यंत वेळ दिला.यानंतर, ट्रम्प सरकारने ९० दिवसांत ९० करार करण्याचे लक्ष्य ठेवले. तथापि, आतापर्यंत फक्त ७ देशांसोबत करार झाले आहेत. ऑर्डर लागू होण्यापूर्वी ज्या वस्तू अमेरिकेत जातील त्यांना जुन्या नियमांनुसार कर भरावा लागेल. यासाठी ५ ऑक्टोबर २०२५ ही शेवटची तारीख आहे.
सिरिया ४१ टक्के टॅरिफसह या यादीत सर्वाधिक वरच्या क्रमांकावर आहे. लाओस आणि म्यानमारवरही ४० टक्के असा मोठा टॅरिफ लावण्यात आला आहे. स्वित्झर्लंडवरही ३९ टक्के असा भरमसाठ टॅरिफ लागू करण्यात आला आहे. इराक आणि सर्बियावर ३५ टक्क्यांच्या दराने शुल्क लावण्यात आले आहे. यादीनुसार ब्राझील आणि ब्रिटनवर १० टक्के, तर न्यूझीलंडवर १५ टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे.
ट्रम्प यांनी ३१ जुलै रोजी भारतावर २५% कर लादण्याची घोषणा केली होती. हा कर ७ ऑगस्टपासून लागू होईल. आतापर्यंत अमेरिका भारतावर १०% बेसलाइन कर लादत आहे.
रशियाकडून शस्त्रे आणि तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर दंड आकारण्यात येईल, असे अमेरिकेने म्हटले आहे. या टॅरिफचा भारतातील स्टील, अॅल्युमिनियम, ऑटोमोबाईल्स, कापड, इलेक्ट्रॉनिक्स आणि दागिने यासारख्या क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode