तेल पाकिस्तानात नव्हे बलुचिस्तानात आहे - बलुच नेते
असीम मुनीरने अमेरिकेची दिशाभूल केली इस्लामाबाद, 3 ऑगस्ट (हिं.स.) : अलीकडेच अमेरिकेने पाकिस्तानसोबत तेलासंदर्भात करार केला आहे. पाकिस्तानचा दावा आहे की, बलुचिस्तानमध्ये तेल आणि अन्य खनिजांचे प्रचंड साठे आहेत. याच दरम्यान बलुच नेते मीर यार बलोच यांनी
बलुच नेते


असीम मुनीरने अमेरिकेची दिशाभूल केली

इस्लामाबाद, 3 ऑगस्ट (हिं.स.) : अलीकडेच अमेरिकेने पाकिस्तानसोबत तेलासंदर्भात करार केला आहे. पाकिस्तानचा दावा आहे की, बलुचिस्तानमध्ये तेल आणि अन्य खनिजांचे प्रचंड साठे आहेत. याच दरम्यान बलुच नेते मीर यार बलोच यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र पाठवून सांगितले की, बलुचिस्तान विक्रीसाठी नाही. जनरल असीम मुनीर यांनी तुम्हाला भूगोलाबाबत चुकीची माहिती दिली आहे.

मीर यार बलोच यांनी पत्रात लिहिले की, बलुचिस्तान हा भाग पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा भाग नाही, तर बलुचिस्तान प्रजासत्ताकाचा भाग आहे, जो ऐतिहासिकदृष्ट्या एक सार्वभौम राष्ट्र राहिला आहे. त्यांचा मुख्य मुद्दा असा होता की हा प्रदेश विक्रीसाठी नाही आणि येथील संसाधनांचे शोषण पाकिस्तान, चीन किंवा इतर कोणत्याही देशाकडून स्वीकारले जाऊ शकत नाही.पुढे ते म्हणाले कि, जनरल असीम मुनीर यांनी तुम्हाला भूगोलाबाबत चुकीची माहिती दिली आहे. या भागातील तेल आणि खनिजांच्या प्रचंड साठ्यांबाबत तुम्हाला पूर्णपणे दिशाभूल करण्यात आली आहे.

अलीकडेच ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत तेल कराराची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले होते की भविष्यात भारतही पाकिस्तानकडून तेल खरेदी करू शकतो. अमेरिकेचा हा करार भारतावर दबाव टाकण्यासाठी एक रणनीती असू शकते. मात्र बलुच नेते या कराराच्या विरोधात उघडपणे पुढे आले आहेत. या भागात आधीच चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग (सीपीईसी) प्रकल्पाचा मोठा प्रभाव आहे, ज्यामुळे स्थानिक बलुच समुदायांचा सरकारांवरील अविश्वास वाढत चालला आहे.बलुच समुदाय अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या ताब्याविरोधात आणि चीनच्या आर्थिक हस्तक्षेपाविरोधात संघर्ष करत आहेत. सीपीईसी प्रकल्पांमुळे येथे विरोध, निदर्शने आणि अगदी सशस्त्र संघर्ष देखील सामान्य झाले आहेत. मीर यार बलोच म्हणाले की आमच्या संसाधनांवर अधिकार फक्त बलुच जनतेचा आहे. हे संसाधन पंजाब किंवा इस्लामाबादमधील कार्यालयांच्या मर्जीने विकले जाऊ शकत नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande