वॉशिंग्टन, 1 ऑगस्ट (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तान संदर्भात अमेरिका पुन्हा एकदा दुहेरी भूमिकेत दिसून आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी(दि.३१) सुमारे ९४ देशांच्या टॅरिफसंबंधी आदेशावर स्वाक्षरी केली असून, हा नवीन कर ७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. या नव्या टॅरिफ यादीनुसार अमेरिकेने भारतावर २५ टक्के कर लावले आहे तर पाकिस्तानवर केवळ १९ टक्के कर लावले आहे.पाकिस्तानवरील हा कर दक्षिण आशियातील कोणत्याही देशावर असलेला सर्वात कमी कर आहे.
ट्रम्प यांनी एप्रिलच्या सुरुवातीला भारतावर २६ टक्के आणि पाकिस्तानवर २९ टक्के कर लादण्याची चर्चा केली होती. त्यानंतर आता नवीन आदेशात ट्रम्प यांनी पाकिस्तानवरील टॅरिफ कमी करून ते पूर्वीच्या २९ टक्क्यांवरून १९ टक्के करण्यात आले आहे तर या नव्या यादीनुसार भारतावर २५ टक्के टॅरिफ कायम ठेवण्यात आले आहे. भारताच्या शेजारील बांगलादेशासाठीही टॅरिफ दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. बांगलादेशचा टॅरिफ ३५ टक्क्यांवरून कमी करून २० टक्के करण्यात आला आहे.
अमेरिकेने भारतावर २५ टक्के आणि बांगलादेशवर २० टक्के कर लादला आहे, ज्यामुळे पाकिस्तानला धोरणात्मक फायदा होऊ शकतो. पाकिस्तानचा सर्वात मोठा निर्यात क्षेत्र म्हणजे कापड उद्योग आणि अमेरिका त्याचा सर्वात मोठा खरेदीदार आहे.भारत, बांगलादेश आणि व्हिएतनाम देखील या बाजारपेठेत आहेत परंतु त्यांच्यावर जास्त शुल्क असल्याने पाकिस्तानला अधिक ऑर्डर मिळू शकतात. पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे ऊर्जा, खनिजे, आयटी आणि क्रिप्टोसारख्या क्षेत्रात नवीन आर्थिक सहकार्य सुरू होईल. दरम्यान, गुरुवारी (दि.३१) ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पाकिस्तानसोबत तेल आणि व्यापार कराराची घोषणा केली. या करारांतर्गत अमेरिका पाकिस्तानला तेल काढण्यात आणि साठवणूक करण्यासाठी मदत करेल. भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल असा दावाही त्यांनी केला.गेल्या काही महिन्यांत अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध खूप जवळचे झाले आहेत. पाकिस्तानने जूनमध्ये ट्रम्प यांचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठीही सुचवले होते. त्याच वेळी, भारतासोबतच्या अमेरिकेच्या संबंधांमध्ये तणाव दिसून आला आहे. यानंतर आता भारताच्या टॅरिफ यादीत कोणताही बदल न होणे हे अमेरिका-भारत संबंधांमध्ये वाढत्या तणावाचे संकेत देते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode