पुढील वर्षीही रेड बुलसोबतच राहणार; मॅक्स वेरस्टापेनकडून घोषणा
बुडापेस्ट, 1 ऑगस्ट (हि.स.) – चार वेळचा फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियन मॅक्स वेरस्टापेन याने आगामी हंगामात मर्सिडीजमध्ये सामील होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. वेरस्टापेनने हंगेरियन ग्रां प्रीपूर्वी स्पष्ट केले की, तो पुढील वर्षीही रेड बुल रेसि
पुढील वर्षीही रेड बुलसोबतच राहणार; मॅक्स वेरस्टापेनकडून घोषणा


बुडापेस्ट, 1 ऑगस्ट (हि.स.) – चार वेळचा फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियन मॅक्स वेरस्टापेन याने आगामी हंगामात मर्सिडीजमध्ये सामील होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. वेरस्टापेनने हंगेरियन ग्रां प्रीपूर्वी स्पष्ट केले की, तो पुढील वर्षीही रेड बुल रेसिंग टीमसोबतच राहणार आहे.

पत्रकारांशी बोलताना वेरस्टापेन म्हणाला, “मला वाटतं, आता या अफवा थांबवण्याची वेळ आली आहे. माझ्यासाठी हे नेहमीच स्पष्ट होतं की मी याच संघात राहणार आहे. आम्ही सातत्याने गाडीच्या कामगिरीबाबत टीमसोबत चर्चा करत आलो आहोत. जेव्हा एखादा ड्रायव्हर टीम सोडण्याच्या विचारात असतो, तेव्हा अशा चर्चा थांबतात. पण मी कधीच असं केलं नाही.”

पुढील वर्षी फॉर्म्युला वनमध्ये इंजिन नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. मर्सिडीज या नव्या युगात आघाडीवर राहील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, रेड बुलने आपली स्वतंत्र पॉवर युनिट विकसित करण्यास सुरुवात केली आहे, जी आता होंडापासून वेगळी असणार आहे.

जरी वेरस्टापेनच्या करारात ‘ब्रेक क्लॉज’चा समावेश आहे, तरी तो अद्याप सक्रिय करण्यात आलेला नाही. सध्याच्या सत्रात झालेल्या 13 रेसपैकी दोन विजयानंतर वेरस्टापेन मधल्या टप्प्यावर तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचा रेड बुलसोबतचा करार 2028 पर्यंतचा आहे.

रेड बुल टीम बॉस ख्रिश्चियन हॉर्नर यांची अलीकडे झालेली बडतर्फी देखील वेरस्टापेनला संघात टिकवून ठेवण्याच्या धोरणाचा भाग असल्याचे मानले जात आहे.

वेरस्टापेन म्हणाला, “काही लोकांना केवळ नाट्य घडवण्याची आवड असते, पण माझ्यासाठी हे नेहमीच स्पष्ट होतं.”

दरम्यान, मर्सिडीजचे टीम बॉस टोतो वोल्फ यांनी अलीकडेच संकेत दिले होते की, त्यांची प्राथमिकता विद्यमान ड्रायव्हर लाईनअप – जॉर्ज रसेल आणि इटालियन ड्रायव्हर किमी अँटोनेली – यांनाच संघात कायम ठेवण्याची आहे.

जॉर्ज रसेलने देखील वेगळा खुलासा करत सांगितले, “मी पुढील वर्षी मर्सिडीजसाठीच रेस करणार आहे, याबद्दल काहीही शंका नाही. मात्र, करारावर स्वाक्षऱ्या ऑगस्ट ब्रेकनंतरच होतील.”

१६व्या वर्षापासून मर्सिडीजच्या मॅनेजमेंटअंतर्गत असलेला रसेल म्हणाला, “सध्या माझं आणि वोल्फ यांचं लक्ष संघाच्या कामगिरीत सुधारणा करण्यावर आहे, करारावर नव्हे.”

तो पुढे म्हणाला, “आमच्यासाठी कराराबाबत कोणतीही घाई नाही.”

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande