मुंबई, 16 ऑगस्ट, (हिं.स.)। अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची आई, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ६८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत.
'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. त्यांच्या अभिनयातून त्यांनी प्रत्येक पात्र जिवंत केलं आणि आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने ठसा उमटवणाऱ्या ज्योती चांदेकर यांनी अनेक लक्षवेधी चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकली.
त्यांचे गाजलेले चित्रपट -
गुरू (2016)
ढोलकी (2015)
तिचा उंबरठा
दमलेल्या बाबाची कहाणी
पाऊलवाट (2011)
मी सिंधूताई सपकाळ (2010)
सलाम (2014)
सांजपर्व (2014)
ज्योती चांदेकर यांची नाट्य आणि पुरस्कार यात्रा
मराठी रंगभूमीवर आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ज्योती चांदेकर यांनी 'मिसेस आमदार सौभाग्यवती' सारख्या नाटकांतून वेगळी छाप उमटवली.
पुरस्कारांनी गौरवलेली कामगिरी -
नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे 'जीवनगौरव पुरस्कार' (2017)
'झी गौरव पुरस्कार 2015' — मुलगी तेजस्विनी पंडितसोबत मिळालेला हा सन्मान त्यांच्या कलायात्रेतील अविस्मरणीय क्षण ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर