मुंबई, 16 ऑगस्ट, (हिं.स.)। आपल्या उत्तम कॉमिक टायमिंग आणि प्रभावी अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडणारा अभिनेता अरशद वारसी पुन्हा एकदा त्यांच्या लोकप्रिय भूमिकेत परतला आहे. ‘जॉली एलएलबी 3’च्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता आता प्रत्यक्षात उतरली आहे. अरशद वारसी पुन्हा एकदा अॅडव्होकेट जगदीश त्यागी ऊर्फ ओरिजनल जॉली म्हणून पडद्यावर धमाल करणार आहे.
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ने भारतीय सिनेमात कोर्टरूम कॉमेडीचा नवा अध्याय सुरू केला होता. मेरठच्या छोट्या शहरातील वकील जॉली त्यागीच्या भूमिकेत अरशद वारसी याने आपल्या साध्या, चतुर आणि विनोदी अंदाजाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती.
या वेळी कथा आणखी रंगतदार असणार आहे. कारण, अरशद वारसीच्या ओरिजनल जॉलीला सामोरा जाणार आहे अक्षय कुमारचा जॉली मिश्रा— आणि या जॉली विरुद्ध जॉलीच्या टक्करीत पुन्हा एकदा गोंधळात सापडणार कायम त्रस्त असलेले न्यायाधीश त्रिपाठी. ही भूमिका जबरदस्त कलाकार सौरभ शुक्ला निभावणार आहेत.
चित्रपटात हुमा कुरेशी, अमृता राव आणि गजराज राव यांच्या महत्त्वाच्या भूमिका असतील. दमदार स्टारकास्ट, सुभाष कपूर यांचे दिग्दर्शन आणि आलोक जैन व अजीत अंधारे यांची निर्मिती यामुळे या चित्रपटात अफलातून कोर्टरूम ड्रामा, विनोद आणि सामाजिक भाष्याचा मसाला पाहायला मिळणार आहे.
१९ सप्टेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे आतापर्यंतची सर्वात मजेशीर आणि धमाकेदार ‘जॉली’ लढाई..
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर