चंदीगड, 17 ऑगस्ट (हिं.स.)।प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव यांच्या गुरुग्राममधील घरावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. माहितीनुसार, एल्विश यादव यांच्या घरावर तीन ते चार फायरिंग राऊंड झाले आहेत. ही घटना आज, रविवारी सकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.
गुरुग्राम पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. तपासात उघड झाले आहे की तीन गुन्हेगार बाईकवर आले होते, त्यापैकी दोन जणांनी एल्विश यादव यांच्या घरावर गोळीबार केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एल्विश यादव यांच्या घराच्या ग्राउंड फ्लोअर आणि पहिल्या मजल्यावर गोळीबार करण्यात आला आहे. एल्विश यादव स्वतः दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर राहतात.ज्या वेळी गोळीबार झाला, त्या वेळी एल्विश यांचे कुटुंबीय आणि केअरटेकर घरात उपस्थित होते.
पोलिसांनी सांगितले आहे की, या प्रकरणात एल्विश यादव यांच्याकडून अधिकृत तक्रार मिळाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. सध्या पोलिस कायदेशीर पद्धतीने आपली प्राथमिक चौकशी करत आहेत. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावरून अनेक पुरावे गोळा केले आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. कुटुंबीयांच्या मते, एल्विश यादव यांना यापूर्वी कोणतीही धमकी मिळालेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode