मुंबई, 2 ऑगस्ट (हिं.स.)। ‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. काळसर रंगाचे रंगवलेले रौद्र रूप, लालसर डोळे आणि विलक्षण कटाक्ष, या सगळ्यातून चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणारी याची उत्कंठा अधिकच वाढते आहे.
सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित ‘दशावतार’ हा चित्रपट कोकणातील प्राचीन दशावतारी परंपरा आणि रहस्यमय पार्श्वभूमी यांचं मिश्रण आहे. पोस्टरमधील चेहरा प्रेक्षकांना अस्वस्थ करतोय, मात्र त्याचवेळी उत्सुकता देखील निर्माण करतोय. हे दिलीप प्रभावळकरच आहेत का? असा प्रश्न पडतो आहे आणि ते नेमके या रुपात काय करणार आहेत याचे कुतूहल निर्माण करत आहे.
सध्या केवळ चेहऱ्याची एक झलक समोर आली असून त्यामागचं खरं रूप, त्याचा संदर्भ आणि कथा अजूनही गूढतेच्या पडद्यात दडलेली आहे. पोस्टरवरुन दिलीप प्रभावळकर यांची ही वेगळीच भूमिका असणार, याचा अंदाज येतोय पण नेमकी ही भूमिका काय असेल याची उत्कंठा आता अधिकाधिक वाढतेय. अर्थातच हे रहस्य १२ सप्टेंबरला रुपेरी पडद्यावरच उलगडेल.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने