नालंदा, 29 ऑगस्ट (हिं.स.) : हॉकी आशिया कपची सुरुवात भारतीय संघाने थरारक विजयाने केली. ग्रुपच्या पहिल्या लीग सामन्यात भारताने चीनवर 4-3 असा विजय मिळवला. नालंदा जिल्ह्यातील राजगीर हॉकी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या रोमहर्षक सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंग याने 3 गोल करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, तर जुगराज सिंगने एक गोल केला.यावेळी विशेष बाब म्हणजे हॉकी आशिया कप 2025 चे आयोजन बिहारच्या राजगीर येथील हॉकी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.
सामन्याच्या सुरुवातीला चीनने पहिला गोल करून भारतावर दडपण टाकले. मात्र भारताने सलग तीन गोल करत 3-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर चीनने जोरदार पुनरागमन करत सामना 3-3 असा बरोबरीत आणला. अखेरच्या क्वार्टरमध्ये, 47व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर चौथा गोल करत भारताला 4-3 अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये चीनने गोल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळाले नाही.
या सामन्यापूर्वी ग्रुप बी मधील इतर सामन्यांमध्ये मलेशियाने बांगलादेशचा 4-1 ने पराभव केला. बांगलादेशने सोळाव्या मिनिटाला पहिला गोल केला होता, परंतु मलेशियाच्या अशरान हमसानीने २५व्या मिनिटाला स्कोर बरोबरीत आणला. दुसऱ्या हाफमध्ये मलेशियाने आक्रमक खेळ करत अखिमुल्लाह अनवार (३६वा मिनिट), मुहाजिर अब्दुल रऊफ (48वा मिनिट) आणि सैयद चोलन (५४वा मिनिट, पेनल्टी कॉर्नर) यांच्या गोलने विजय निश्चित केला.
दुसऱ्या सामन्यात दक्षिण कोरियाने चीनी तैपेचा 7-0 असा पराभव केला. डॅन सॉनने १७व्या, २९व्या आणि 58व्या मिनिटाला हॅट्ट्रिक करत चमकदार खेळ केला. जिहुन यांगने पेनल्टी कॉर्नरवर २७व्या आणि पंन्नासाव्या मिनिटाला 2 गोल केले. त्याशिवाय सेयोंग ओह (53वा मिनिट) आणि युनहो कोंग (54वा मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला.-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी