जेव्हा भारताने पाणी सोडले तेव्हा मृतदेह तरंगत आले- पाक संरक्षणमंत्री
इस्लामाबाद , 29 ऑगस्ट (हिं.स.)।भारताकडून सोडण्यात आलेल्या पुराच्या पाण्यासोबत मृतदेह, जनावरं आणि मोठ्या प्रमाणावर मलबा पाकिस्तानमध्ये वाहून आला आहे, असे विधान पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी केले. पूरग्रस्त सियालकोटच्या दौऱ्यावर अ
पाक  संरक्षणमंत्री


इस्लामाबाद , 29 ऑगस्ट (हिं.स.)।भारताकडून सोडण्यात आलेल्या पुराच्या पाण्यासोबत मृतदेह, जनावरं आणि मोठ्या प्रमाणावर मलबा पाकिस्तानमध्ये वाहून आला आहे, असे विधान पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी केले. पूरग्रस्त सियालकोटच्या दौऱ्यावर असताना ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी हे विचित्र विधान केलं आहे.

पाकिस्तानच्या पंजाब, सियालकोट आणि इतर भागांमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्त सियालकोटच्या दौऱ्यावर असताना आसिफ यांनी म्हटलं की, भारताकडून सोडण्यात आलेल्या पुराच्या पाण्यासोबत मृतदेह, जनावरं आणि मोठ्या प्रमाणावर मलबा पाकिस्तानमध्ये वाहून आला आहे. त्यांनी असंही सांगितलं की,हा मलबा स्थानिक प्रशासनाच्या मदत कार्यात अडथळा निर्माण करत आहे. आसिफ यांनी पुढे म्हटलं की, सियालकोट हे जम्मू भागातून येणाऱ्या जलमार्गांच्या खाली स्थित आहे आणि जेव्हा जेव्हा भारत पाणी सोडतो, तेव्हा तिथे नियमितपणे पूर येतो. मात्र, त्यांनी हे देखील मान्य केलं की भारताने नद्यात पाणी सोडण्यापूर्वी पाकिस्तानला दोन वेळा माहिती दिली होती.

ख्वाजा आसिफ यांचं हे विधान पाकिस्तानी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालं. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आणि म्हटलं की, सरकार आपली अपुरी तयारी आणि ढासळलेली पायाभूत रचना झाकण्यासाठी भारतावर आरोप करत आहे. काही लोकांनी उपरोधाने लिहिलं की “पूर पाण्याने येतो, लाशांनी नाही.”हा वाद अशा वेळी उभा राहिला आहे जेव्हा भारत-पाकिस्तानमधील सिंधू जल करार आधीच स्थगित झालेला आहे. या कराराअंतर्गत दोन्ही देश जलसंबंधी माहितीची देवाणघेवाण करायचे, पण एप्रिल २०२५ मधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ही देवाणघेवाण थांबवली. तरीही, भारताने लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानला खराब हवामान आणि संभाव्य पूर यासंबंधी माहिती दिली होती.

पाकिस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे आतापर्यंत ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. १२ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले असून सुमारे २.५ लाख लोक विस्थापित झाले आहेत. जवळपास १,४३२ गावे पाण्याखाली गेली आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, व्यवसाय ठप्प झाले आहेत आणि हजारो कुटुंबं मदत छावण्यांमध्ये राहायला भाग पडली आहेत. सरकारने ७०० मदत छावण्या आणि २६५ वैद्यकीय छावण्या उभारल्या आहेत, पण प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

पाकिस्तानी सिंचन विभागाच्या मते, ३८ वर्षांनंतर प्रथमच रावी, सतलज आणि चिनाब नद्या एकत्रितपणे धोक्याच्या पातळीवर आल्या आहेत. यामुळे बचाव कार्य अधिक कठीण झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लष्कर आणि मदत पथकांनी २४ तास आपत्ती व्यवस्थापनाचे अभियान सुरू केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande