आंध्र पोलिसांपुढे ‘लोन वुल्फ’चा धक्कादायक खुलासा
अमरावती, 30 ऑगस्ट (हिं.स.) : आंध्र प्रदेश पोलिसांनी अबू बकर सिद्दीकी नामक एका ‘लोन वुल्फ’ (एकट्याने काम करणारा) दहशतवाद्याला अटक केली आहे. अबु बकरकडे बॉम्ब बनवण्याचे कौशल्य आहे. चौकशीत त्याने सांगितले की, तो झाकिर नाईकच्या विचारधारेपासून प्रेरित होता.
सुरक्षा एजन्सींच्या मते, नाईकचा प्रभाव फक्त भारतापर्यंत मर्यादित नाही, तर त्याचा संदेश अनेक देशांमध्ये पसरला आहे. नाईकचे भाषण आणि उपदेश विशेषत: तरुण पिढीला अतिवादाच्या दिशेने आकर्षित करत आहेत, त्यामुळे त्याला दहशतवादी गटांपेक्षा जास्त धोकादायक मानले जाते.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, अबू बकर सिद्दीकी एकटा काम करत होता आणि त्याला झाकिर नाईकच्या भडकाऊ भाषणांनी प्रेरित केले होते. भारतीय सुरक्षा एजन्सी अनेक वर्षांपासून नाईकचा शोध घेत आहेत, कारण त्याच्या भाषणांचा युवा पिढीवर खूप वाईट प्रभाव आहे. नाईकने अल-कायदाच्या समर्थनाची खुलेपणाने घोषणा केली होती, तरीही तो अधिकृतपणे कोणत्याही दहशतवादी गटाचा भाग नाही. त्याचे भाषण आणि संदेश ऑनलाइन लाखो लोकांपर्यंत पोहचतात, ज्यामुळे सुरक्षा एजन्सींसाठी चिंता वाढत आहे. भारतातून 2016 मध्ये मलेशियात पळून गेलेला नाईक अजूनही तिथे मुक्तपणे फिरतो आहे. तसेच त्याच्यावर कोणतेही प्रतिबंध नाहीत.
नाईकच्या भाषणामुळे प्रभावित होऊन बांगलादेशच्या ढाका कॅफे हल्ल्याच्या योजनांमध्ये सहभाग असलेल्या हल्लेखोरांना प्रेरणा मिळाली होती. जरी नाईक त्या हल्ल्यात सहभागी नसला तरी, हल्लेखोरांनी कबूल केले होते की त्याच्या भाषणांनी त्यांना हल्ला करण्यासाठी प्रेरित केले.अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, नाईक खूप चतुर आहे आणि तो उघडपणे हल्ल्यांबद्दल बोलत नाही. तरीही, त्याचे भडकाऊ भाषण आणि विचारधारा अतिवादाला खतपाणी देत आहेत. भारतीय एजन्सी त्याला मनी लॉन्डरिंग आणि अतिवाद पसरविण्याच्या आरोपांखाली शोधत आहेत.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी