अकोला, 31 ऑगस्ट (हिं.स.)।
मुर्तीजापुर तालुक्यातील रेपाडखेड गावात पुन्हा एकदा हृदय हेलावणारी घटना घडली आहे. अल्पभूधारक शेतकरी गजानन मिलखे यांचा 27 वर्षीय पुत्र अभिलाष याने स्वतःचे आयुष्य संपवले. चार दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी सदृष्य मुसळधार पावसाने त्यांच्या तीन एकर कोरडवाहू शेतातील हिरवेगार सोन्यासारखे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केले. कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटाने आणि उधारीच्या ताणाने ग्रस्त होऊन अभिलाषने 4 दिवसांपूर्वी विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता.
तातडीने त्याला अकोला येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही.आणि उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत कायमची मावळली. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
आज 31 ऑगस्ट रोजी सकाळी अभिलाषचा अंत्यसंस्कार गावात शोकाकुल वातावरणात करण्यात आला. यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी, कुटुंबीय, नातेवाईक तसेच विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी शासनाविरुद्ध संतप्त रोष व्यक्त करत कर्जमाफीचे फक्त आश्वासन, प्रत्यक्षात मदत शून्य असा आरोप केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सतत बदलते हवामान, असमान पाऊस, सिंचनाच्या सुविधा नसणे आणि पीक विमा योजनांची अंमलबजावणी न होणे यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तरीही प्रशासन आणि सरकारकडून ठोस मदतीऐवजी केवळ दिलासा देणारी वक्तव्येच केली जात आहेत, अशी टीका ग्रामस्थांनी केली.
रेपाडखेड परिसरातील शेतकरी सांगतात की, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे शेतातील पीक नष्ट झाले, त्यातच उधारीचा बोजा, बँकांचे फोन, सावकारांचा तगादा… या सगळ्याचा नैराश्याचा परिणाम झाला आणि अभिलाषने हे टोकाचे पाऊल उचलले.
शेतकरी संघटनांनी तातडीने मदतीची मागणी करत अभिलाषच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य, पीक विम्याची रक्कम आणि कर्जमाफी देण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे. मात्र जोपर्यंत ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत अशा घटना पुन्हा घडणार, अशी भीती संघटनांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे