नांदेड, 3 सप्टेंबर (हिं.स.)।
केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना कार्यरत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम व अटी शर्तीची पुर्तता करुन अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज परिपूर्ण भरुन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के कर्ज राष्ट्रीयकृत बँकेकडुन स्वत: मंजुर करुन घेणे आवश्यक आहे. प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के स्व:हिस्सा कर्ज खात्यात जमा करणे बंधनकारक राहील. प्रकल्प किंमतीच्या 15 टक्के मार्जिन मनी (Subsidy) कर्ज खात्यात शासनाकडून एनईएफटी/आरटीजीएसद्वारे जमा करण्यात येते. ज्या प्रकल्पासाठी या योजनेचा लाभ घेण्यात आला आहे, त्याच प्रकल्पावर सदरची रक्कम खर्च करणे बंधनकारक आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील सुशिक्षित बेरोजगार यांच्याकडुन सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरचा ऑफलॉईन अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. सुशिक्षीत बेरोजगारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis