मुक्त विद्यापीठ : उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ब्लॉकचेन क्यूआर कोड अंकित डिजिटल गुणपत्रक उपलब्ध
नाशिक, 31 ऑगस्ट (हिं.स.) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने मे २०२५ च्या अंतिम वर्ष परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या पदवी, पदविका व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञान आधारित क्यूआर कोड असलेले डिजिटल गुणपत्रके त्यांच्या ईमेलवर प
मुक्त विद्यापीठाच्या मे २०२५ अंतिमवर्ष परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाब्लॉकचेन क्यूआर कोड अंकित डिजिटल गुणपत्रक उपलब्ध


नाशिक, 31 ऑगस्ट (हिं.स.)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने मे २०२५ च्या अंतिम वर्ष परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या पदवी, पदविका व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञान आधारित क्यूआर कोड असलेले डिजिटल गुणपत्रके त्यांच्या ईमेलवर पाठवली आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक, व्यावसायिक वा नोकरीविषयक कामकाज किंवा मुलाखतीसाठी मूळ गुणपत्रक सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर २०२३ पासून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पदवी आणि पदविका प्रमाणपत्रांवर ब्लॉकचेन क्यूआर कोड वापरण्यास सुरुवात केली आहे. यंदा मे २०२५ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण ९२,३१२ विद्यार्थ्यांपैकी, ८१,८५३ विद्यार्थ्यांना त्यांची डिजिटल गुणपत्रके ईमेलद्वारे पाठवण्यात आली आहेत. मात्र, १०,४५९ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवेशावेळी आपले चुकीचे ईमेल आयडी नोंदवल्यामुळे त्यांना ही गुणपत्रके अद्याप मिळालेली नाहीत. या संदर्भात संबधित विद्यार्थ्यांनी त्यांचे ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक अचूकपणे नोंदवणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील परीक्षा आणि महत्त्वाच्या सूचना वेळेवर मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या डीयु (DU) पोर्टलवर लॉगिन करून आपली वैयक्तिक माहिती तपासून ती अद्ययावत करावी असे आवाहन परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे या डिजिटल गुणपत्रकांची सुरक्षा पूर्णपणे सुनिश्चित आहे. कोणालाही कोणत्याही गुणपत्रकातील माहिती बदलता येत नाही. परिणामी विदयार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश किंवा नोकरी देणाऱ्या कंपन्या, आस्थापना किंवा संस्थांना या गुणपत्रकांची पडताळणी काही सेकंदांमध्ये ऑनलाइन पद्धतीने जलद, सहज व सोप्या पद्धतीने करता येईल. ही पूर्णपणे कागदविरहीत प्रक्रिया असून, यामुळे श्रम व वेळेची बचत होणार आहे.

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande