मुंबई, 3 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल पाच दिवस मुंबईत ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांनी अखेर माघार घेतली आहे. राज्य सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आपले बेमुदत आमरण उपोषण मंगळवारी मागे घेतले. रात्री उशिरा त्यांनी मुंबई सोडली आणि हजारोंच्या संख्येने आलेले मराठा बांधव परतले. विजयाचा गुलाल उधळत आंदोलनाची सांगता झाली असली तरी आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची पोलिसांची कारवाई मात्र थांबलेली नाही. या आंदोलनादरम्यान मुंबई शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आंदोलनादरम्यान आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलकांनी अक्षरशः चक्का जाम केला होता. मर्यादित जागा असल्याने हजारो लोकांनी सीएसएमटी आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर तळ ठोकला होता. मंत्रालय, आमदार निवास, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मरिन ड्राईव्ह या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने वाहतुकीतही अडथळे निर्माण झाले. या काळात काही आंदोलकांचा स्थानिक नागरिकांशी खटके उडाल्याचे प्रकार समोर आले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मुंबईतील आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, डोंगरीसह मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात बेकायदेशीर जमाव जमवणे, रस्ता अडवणे आणि दमदाटी करणे यांसारख्या आरोपांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अज्ञात आंदोलकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील झोन १ च्या हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात ३, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात २ तर जे. जे. मार्ग, कुलाबा, एम.आर.ए. मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये बेकायदेशीर जमाव जमवणे, दमदाटी करणे यांसारखे आरोप ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी जुहू परिसरात झालेल्या घटनेतही आंदोलकांवर कारवाई झाली होती. रविवारी जुहू बस स्थानकात आंदोलक आणि प्रवाशांमध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीत बसच्या काचा फोडल्या गेल्याने जुहू पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन काळात नोंदवलेले पहिले प्रकरण ठरले. आंदोलनाच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना केल्या होत्या. तरीही आंदोलकांकडून झालेल्या नियमभंग, धमकावणे आणि गर्दी जमवण्याच्या प्रकारांवरून कारवाई अनिवार्य ठरली आहे. आतापर्यंत अनेक गुन्ह्यांमध्ये आंदोलकांवर दडपशाही, धमकी आणि सार्वजनिक सुव्यवस्थेचा भंग यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस करत असून, यामध्ये सहभागी असलेल्या आंदोलकांचा शोध घेतला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule