वॉशिंग्टन, 4 ऑगस्ट (हिं.स.)।प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री लोनी अँडरसन यांचे निधन झाले आहे. ३ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७९ वर्षाच्या होत्या. त्या खूप काळापासून आजारी होत्या. त्यामुळे लॉस एंजेलिसमधील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर रविवारी(दि.३) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची माहिती लोनी अँडरसनच्या कुटुंबीयांनी अधिकृत निवेदन जाहीर करून दिली आहे.
लोनी अँडरसनच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची माहिती देताना आपल्या निवेदनात म्हटले आहे, “खूप दुःखाने आम्ही कळवत आहोत की आमची प्रिय पत्नी, आई आणि आजी यांचे निधन झाले आहे.”
लोनी अँडरसन यांना १९७८ ते १९८२ या काळात प्रसारित झालेल्या अमेरिकन सिच्युएशनल कॉमेडी शो मध्ये त्यांनी साकारलेल्या रिसेप्शनिस्ट जेनिफर मार्लो या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली.या शोचे चार सिझन्स होते आणि प्रत्येक सिझनमध्ये २२ एपिसोड्स होते. लोनी अँडरसन या केवळ प्रोफेशनल आयुष्यातच चर्चेत नव्हत्या, तर त्या त्यांच्या खाजगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिल्या.
१९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्ट्रोकर ऐस’ या चित्रपटात त्यांच्या को-स्टार बर्ट रेनॉल्ड्स यांच्यासोबतच्या अफेअरमुळे त्या खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघांनी लग्न केले, मात्र त्यांचे हे नातं १९९४ मध्ये घटस्फोटावर येऊन पोहोचले. या दोघांनी एक दत्तक मुलगा स्वीकारला होता, ज्याचे नाव क्विंटन रेनॉल्ड्स आहे. लोनी अँडरसन यांचे चार विवाह झाले होते. लोनी अँडरसन त्यांच्या कुटुंबासाठी अंदाजे १२–१३ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १०० कोटी रुपयांहून अधिक) ची संपत्ती मागे ठेवून गेल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode