नवी दिल्ली , 5 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी उशिरा पुन्हा एकदा रशियन तेलाचा हवाला देऊन भारतावर अधिक कर लादण्याची धमकी दिली. ट्रम्प यांच्या धमकीला भारत सरकारनेही पहिल्यांदाच उघडपणे प्रत्युत्तर दिले. रशियाकडून अमेरिका आणि युरोपियन युनियनला होणाऱ्या निर्यातीचा डेटा जाहीर करून भारताने ट्रम्प यांना आरसा दाखवला.
ट्रम्प यांच्या धमकीला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, रशियाकडून तेल आयात केल्यामुळे भारत अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या रडारवर आहे. खरं तर, युद्ध सुरू झाल्यानंतर तेलाचा पुरवठा युरोपकडे वळवण्यात आल्यामुळे भारताने रशियाकडून आयात करण्यास सुरुवात केली. त्यावेळी, जागतिक ऊर्जा बाजारपेठेची स्थिरता मजबूत करण्यासाठी अमेरिकेने भारताकडून अशा आयातीला सक्रियपणे प्रोत्साहन दिले. मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, भारताच्या आयातीचा उद्देश भारतीय ग्राहकांना अपेक्षित आणि परवडणाऱ्या ऊर्जा खर्चाची खात्री करणे आहे. भारतावर टीका करणारे देश स्वतः रशियासोबत व्यापारात गुंतलेले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की अमेरिका आपल्या अणुउद्योगासाठी युरेनियम हेक्साफ्लोराइड, ईव्ही उद्योगासाठी पॅलेडियम, रशियाकडून खते आणि रसायने आयात करत आहे. युरोपियन संघाच्या बाबतीतही असेच आहे. अशा परिस्थितीत भारताला लक्ष्य करणे अन्यायकारक व तर्कहीन आहे.’ भारत त्यांच्या राष्ट्रीय हितांचे आणि आर्थिक सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व उपाय करेल.असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की,स्वतःच्याच टेरिफ वॉरमध्ये अडकलेले ट्रम्प भारत आणि रशियावर हल्ला करत आहेत.आकडेवारीवरून असे दिसून येते की चीन रशियाकडून कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. डिसेंबर २०२२ ते जून २०२५ पर्यंत रशियाच्या एकूण कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी ४७% चीनला गेला. त्याच वेळी भारताने ३८% आयात केली. युरोपीय संघ आणि तुर्कीने रशियाकडून प्रत्येकी ६ टक्के कच्च्या तेलाची आयात केली. तर जास्त टेरिफची धमकी देणाऱ्या अमेरिकेने २०२४ मध्ये रशियाकडून ३ अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तू आयात केल्या. यंदा पहिल्या पाच महिन्यांतच अमेरिकेने रशियाकडून २.०९ अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तू आयात केल्या. या वर्षी तो ४ अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल.
२०२४ मध्ये युरोपियन युनियनने रशियासोबत सुमारे ७२.९ अब्ज डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार केला. २०२३ मध्ये सेवांमध्ये १८.६ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. त्या वर्षी किंवा त्यानंतर भारताच्या रशियासोबतच्या एकूण व्यापारापेक्षा हा व्यापार जास्त आहे. २०२४ मध्ये युरोपियन युनियनने रशियाकडून १६.५ दशलक्ष टन द्रवीभूत नैसर्गिक वायू (एलएनजी) आयात केला. २०२२ मध्ये १.५२१ कोटी टन विक्रम ओलांडला. युरोप रशियासोबत खते, खाण उत्पादने, रसायने, लोखंड आणि पोलाद आणि यंत्रसामग्रीचा व्यापार देखील करतो.
दरम्यान, गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लादला होता, जो ७ ऑगस्टपासून लागू होईल. त्यानंतर सोमवारी(दि.४) रात्री ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर लिहिले होते की, ‘भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे आणि त्याचा मोठा भाग बाजारात चढ्या किमतीत विकून मोठा नफा कमावत आहे. म्हणूनच मी भारतावर कर वाढवत आहे.’
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode