राज्यात पुन्हा पावसाची जोरदार हजेरी; पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, 14 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यात शनिवारपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील काही दिवस मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण राज्यात प
Heavy rain warning in the state from today


मुंबई, 14 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यात शनिवारपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील काही दिवस मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यातील बहुतांश भागांत पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

शनिवारी सकाळपासून अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या भागांत रविवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय काही भागांत कमी वेळात मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेले काही दिवस विश्रांती घेतलेला मोसमी पाऊस शनिवारपासून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यभर पावसाने जोर धरला आहे.

मुंबईसह आजूबाजूच्या भागात शनिवारी रात्री विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसला. आजही हा पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. ठाणे शहर आणि परिसरातही शनिवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. दिवसभर शहर व उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण होते. कुलाबा हवामान केंद्रात २९ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात २९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत होता, मात्र शनिवारी सकाळपासून दहिसर, बोरिवली, कांदिवली आणि नवी मुंबई परिसरात जोरदार पावसाची सुरुवात झाली. रात्री काही भागांत मुसळधार पाऊस झाला.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार तर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून मुसळधार पावसामुळे काही भागांत पाणी साचू शकते, वाहतुकीस अडथळे निर्माण होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने सुरक्षित ठिकाणी राहावे आणि गरज असल्यासच बाहेर पडावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande