पावसामुळे वैष्णोदेवी यात्रा पुन्हा स्थगित; उत्तर भारतात पावसाचा कहर
श्रीनगर, 14 सप्टेंबर (हिं.स.)। जम्मू आणि काश्मीरमध्ये सततच्या पावसामुळे प्रसिद्ध वैष्णोदेवी यात्रा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. १९ दिवसांच्या खंडानंतर रविवारपासून यात्रा पुन्हा सुरू होणार होती, मात्र मुसळधार पावसामुळे आणि मार्गावरील धोका लक्षात
Vaishnodevi Yatra postponed again due to rain


श्रीनगर, 14 सप्टेंबर (हिं.स.)। जम्मू आणि काश्मीरमध्ये सततच्या पावसामुळे प्रसिद्ध वैष्णोदेवी यात्रा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. १९ दिवसांच्या खंडानंतर रविवारपासून यात्रा पुन्हा सुरू होणार होती, मात्र मुसळधार पावसामुळे आणि मार्गावरील धोका लक्षात घेऊन प्रशासनाने ती पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला. २६ ऑगस्ट रोजी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर झालेल्या भूस्खलनात ३४ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हवामान सुधारल्यावरच यात्रा पुन्हा सुरू करण्याची योजना आखण्यात आली होती, मात्र पावसाने अडथळा आणला.

दरम्यान, उत्तर प्रदेशात गंगा, यमुना आणि इतर नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने अनेक भागात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बलियामध्ये गंगा नदी दुथडी भरून वाहत असून, शनिवारी चक्की नौरंगा गावातील पाच घरे आणि पाच दुकाने नदीच्या पाण्यात बुडाली. राज्यात या पावसाळ्यात आतापर्यंत ४ टक्के कमी पावसाची नोंद झाली असली, तरी सततचा मुसळधार पाऊस नद्यांना पूरस्थितीकडे ढकलत आहे.

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा फटका सर्वाधिक बसला आहे. मंडी जिल्ह्यातील धरमपूर तालुक्यातील सपदी रोह गावात शनिवारी भूस्खलन झाल्याने अनेक घरांमध्ये मातीचा ढिगारा शिरला. खबरदारी म्हणून आठ घरे स्थलांतरित करण्यात आली आहेत. राज्यात या हंगामात पाऊस आणि पुरामुळे मृतांचा आकडा ३८६ वर पोहोचला आहे. १२ सप्टेंबरपर्यंत हिमाचलमध्ये सरासरी ६४.६ मिमी पावसाच्या तुलनेत तब्बल १५०.४ मिमी म्हणजे १३३ टक्के अधिक पाऊस पडल्याची हवामान खात्याने माहिती दिली आहे.

राजस्थानमध्ये मात्र मान्सून माघारीला सुरुवात झाली आहे. राज्याच्या पश्चिम भागातून रविवारी मान्सून बाहेर पडू लागला असून, मध्य प्रदेशात त्याला आणखी दोन आठवडे लागू शकतात. भारतीय हवामान विभागाने सांगितले की १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान मध्य प्रदेशातील मालवा-निमार पट्ट्यात पावसाचा आणखी एक टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतातील या पावसाळी घडामोडींमुळे पर्यटन, वाहतूक आणि शेती क्षेत्रांवर मोठा परिणाम होत असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित स्थळी हलण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande