निधी वाटपात असमानता : आ. पठाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
अकोला, 15 सप्टेंबर (हिं.स.)। महानगरातील काँग्रेस नगरसेवकांचे प्रभाग विकासापासून कोसो दूर असून महानगर पालिकेच्या द्वारे होणाऱ्या निधी वाटपातील असमानता त्याला कारणीभूत आहे. आगामी काळात विकास निधीचे नियोजनात कोणत्याही प्रकाराचा भेदभाव न करता ज्या ठिकाण
P


अकोला, 15 सप्टेंबर (हिं.स.)।

महानगरातील काँग्रेस नगरसेवकांचे प्रभाग विकासापासून कोसो दूर असून महानगर पालिकेच्या द्वारे होणाऱ्या निधी वाटपातील असमानता त्याला कारणीभूत आहे. आगामी काळात विकास निधीचे नियोजनात कोणत्याही प्रकाराचा भेदभाव न करता ज्या ठिकाणी खरोखर निधीची आवश्यकता आहे, विकासाची गरज आहे अशा ठिकाणी विकासकामे करण्यात यावी अशी मागणी आ. साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात आलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक सुनील लहाने यांना केली.

गेल्या दोन वर्षाच्या वर कालावधीपासून अकोला मनपात प्रशासक राज आहे. या काळात शहरात निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला, मात्र त्यातून झालेली विकासकामे, निधी वितरण मधील भेदभाव यामुळे काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासाचा अभाव आहे. तर बहुल दलीत वस्ती असलेल्या प्रभाग क्रमांक २ आणि १ मध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामांचा अभाव आहे. तर दलीत वस्तीच्या निधी वाटपात सुद्धा मोठ्या प्रमाणात भेदभाव करण्यात आला असून शहरात सर्वात जास्ती दलीत बहुल लोकसंख्या असलेल्या प्रभाग क्रमांक २ मध्ये अतिशय तुरळक प्रमाणात निधी देण्यात आला होता. तर जुने शहर परिसरातील प्रभाग क्रमांक मध्ये अनेक गल्ली बोळ मध्ये रस्तेच नाही, परिणामी स्थानिक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरत असून नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागत आहे. आतापर्यंत जे झाले ते झाले मात्र आता आपल्या प्रशासक काळात विकासापासून उपेक्षित असलेल्या या काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागात निधी देण्यात यावा अशी आग्रही मागणी आ. पठाण यांच्या नेतृत्त्वाखाली आलेल्या काँग्रेस नगरसेवकांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक सुनील लहाने यांना केली. तर सर्व नगरसेवकांच्या भावना जाणून घेत या प्रभागांची पाहणी करून ज्या ठिकाणी विकासाची गरज आहे, अश्या ठिकाणी निधी वितरण करून विकासकामे करण्यात येईल असे आश्वासन मनपा आयुक्त सुनील लहाने यांनी यावेळी उपस्थितांना दिले.

यावेळी मोहम्मद इरफान, मोईन उर्फ मोंटू खान, सुवर्णरेखा विजय जाधव, चांदणी रवी शिंदे, रवी शिंदे, पराग कांबळे, शेख अब्दुल्ला, फिरोज गवळी, फिरोज खान, आकाश कवडे, राहुल सारवान, अभिजित तवर, विनोद मराठे, मंजूर खान यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande