डिजिटल मीडिया पत्रकांराच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरू – एस.एम.देशमुख
छत्रपती संभाजीनगर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिले राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडले. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यां
Q


छत्रपती संभाजीनगर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिले राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडले. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना मोठी घोषणा केली आहे. ‘डिजिटल मीडियामधील पत्रकारांना आजही शासन दरबारी पत्रकार म्हणून मान्यता दिली जात नाही, ही मोठी शोकांतिका आहे. एखादी बातमी काही क्षणामध्ये जगभर पोहोचवणाऱ्या डिजिटल मीडियातील पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सरकार चालढकल करीत आहे. सरकारने तातडीने या पत्रकारांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा वेळप्रसंगी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषद रस्त्यावर उतरून आंदोलन करू,’ असा इशारा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दिला आहे.

माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार डॉ. भागवत कराड, ज्येष्ठ पत्रकार तुळसीदास भोईटे, धनंजय लांबे, डॉ.अनिल फळे, रवींद्र पोखरकर यांनीही या अधिवेशनात मार्गदर्शन केले. याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, सह प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, गो.पी.लांडगे, डीजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, सचिव प्रकाश भगनुरे, कार्याध्यक्ष कानिफ अन्नपूर्णे, मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे, उपाध्यक्ष महादेव जामनिक, कोषाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले पत्रकार उपस्थित होते.

या अधिवेशनात पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडत देशमुख यांनी ‘पत्रकारांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात’ अशी मागणी केली. एस.एम.देशमुख म्हणाले, ‘पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होऊन सात वर्षे उलटली तरी सरकारने अधिसूचना काढलेली नाही. यु ट्युबवर काम करणाऱ्या पत्रकारांना पत्रकार म्हणून मान्यता मिळालेली नाही, तसेच पेन्शन व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नांबाबत चालढकल करत आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सातत्याने पत्रकारांच्या प्रश्नांवर आवाज उठवत असते. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी परिषदेच्या माध्यमातून विविध आंदोलने करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे पत्रकारांच्या समस्या सुटण्यास देखील मदत झाली आहे. पण आता प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधील पत्रकारांसोबतच डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नासाठी संघटनेचा लढा सुरू राहील, असेही देशमुख म्हणाले. डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळाली पाहिजे, युट्यूब चँनल साठी सरकारी जाहिराती मिळाल्या पाहिजेत आणि ज्या सवलती प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियातील पत्रकारांना मिळतात त्या सर्व सवलती डिजिटल मिडियातील पत्रकारांना देखील मिळाव्यात अशी आग्रही मागणी देशमुख यांनी केली.. या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले..

या अधिवेशनाला माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार डॉ. भागवत कराड यांनी देखील भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या आरोग्यविषयक, रेल्वेविषयक व लघुउद्योगांना मदत मिळावी यासाठी मुद्रा लोनविषयी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर आहे, असेही ते म्हणाले.

अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे, रवींद्र पोखरकर, धनंजय लांबे, डॉ. अनिल फळे यांनी डिजिटल मीडियासंबंधी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार तसेच राज्याच्या विविध भागात डिजिटल माध्यम क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा देखील सन्मान करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande